पेण तालुक्यातील कासू गावचे लक्ष्मण तांडेल हे चित्रकार आज आपल्या आयुष्याची अखेरची घटका मोजत आहेत. ब्रेन टय़ुमरसारख्या दुर्धर आजाराने त्यांना ग्रासले आहे. जीवनाचा शेवट कधी होईल याचे अंदाज त्यांना नाही मात्र तरीही हक्काच्या धान्यासाठी त्यांची पायपीट सुरूच आहे.
 व्यवसायाने चित्रकार असणारे लक्ष्मण तांडेल यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांच्या या आर्थिक परिस्थितीमुळे शासनाने त्यांना बीपीएल रेशन कार्ड दिले आहे. नियमानुसार त्यांना बीपीएल कार्डावर ३५ किलो धान्य मिळणे आवश्यक आहे. मात्र गेल्या २१ वर्षांत त्यांना कधीही नियमानुसार ३५ किलो धान्य मिळालेले नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने रास्त धान्य दुकानातून येणाऱ्या धान्यावरच त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो आहे. मात्र गावातील रास्त धान्य दुकानदार त्यांना पूर्ण धान्य द्यायला तयार नाही. आजवर केवळ १७ किलोच धान्य आपल्याला मिळाल्याचा आरोप तांडेल यांनी केला आहे. तर गहू जास्त पाहिजे असतील तर जादा दराने विकत घ्या, असा सल्ला दुकानदार देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे आणि हीच तक्रार घेऊन त्यांची पायपीट सुरू आहे.
   आपल्या माफक तक्रारीसाठी त्यांनी शासनाचे सर्वच उंबरठे झिजवले आहेत. तहसीलदारांपासून मंत्र्यांपर्यंतचे सर्वच मार्ग त्यांनी चाचपडले आहेत. मात्र हक्काचे धान्य त्यांना काही मिळालेले नाही. या प्रकरणात तहसीलदारांना आतापर्यंत २० ते २५ अर्ज दिलेत, तर जिल्हाधिकाऱ्यांकडे लोकशाही दिनात आणि नारायण राणे यांच्याकडे जनता दरबारातही अर्ज दिले आहेत. मात्र कोणीही दखल घेतली नसल्याचे तांडेल यांनी सांगितले. माझा दुकानदाराशी वाद नाही, पण माझ्या हक्काचे धान्य मिळाले पाहिजे एवढी माफक अपेक्षा त्यांची आहे.
   शासनाने झोपेचे सोंग घेतले आहे आणि शरीरही साथ देत नाही. उद्याचा दिवस माझा असेल का याची शाश्वती राहिलेली नाही. अर्ज आणि तक्रारी करताना वार्धक्यामुळे त्यांचे हातही कंप पावायला लागले आहेत, पण तरीही हक्काच्या धान्यासाठी त्यांची पायपीट सरू असल्याचे तांडेल यांनी सांगितले आहे.