पालघर जिल्हा परिषद : सत्तेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी एकत्र येणार का?

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्षाने आपले संख्याबळ गेल्या जिल्हा परिषदे इतकेच राखले आहे.

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर :  जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपला संमिश्र यश मिळाले असून सत्ता स्थापन करण्यासाठी  या पक्षांकडे पुरेसे   संख्याबळ  नाही. त्यामुळे जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा प्रयोग करावा लागणार आहे. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावे लागेल.

जिल्ह्यातील ५७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला १८ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादीकडे १४, कम्युनिस्ट पक्षाचे पाच, बहुजन विकास आघाडीचे चार, काँग्रेसचा एक व तीन अपक्ष असे एकत्र २६ चे संख्याबळ होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी महाआघाडीला शिवसेनेची गरज भासणार आहे.

पालघर लोकसभेची जागा भाजपने शिवसेनेला दिल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विक्रमगड आणि डहाणू या दोन मतदारसंघामध्ये पराभव झाला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही  भाजपने गमावले असून आठ तालुक्यांपैकी कोणत्याही तालुक्यांत भाजपचे निर्विवाद वर्चस्व नाही. मोदी लाटेत पक्षप्रवेश केलेल्या नेत्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन झाले नाही. तसेच  उमेदवार ठरविताना अशा मंडळींना विश्वासात घेतले न गेल्याचे परिणाम आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे असताना पाच वर्षांत जिल्ह्याचा अपेक्षित गतीने विकास साधण्यात भाजप अपयशी ठरला.  विकासकामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला अपयशी ठरल्याने पिछेहाट झाली आहे. भाजपमधील वादही उमेदवारीवाटपात उफाळला.

राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रमगड मतदारसंघात खणखणीत कामगिरी केली. वाडा आणि विक्रमगड तालुक्यात जिजाऊ संस्थेच्या मदतीने राष्ट्रवादीने अधिकांश जागांवर विजय संपादित केला. डहाणूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पूर्वीची ताकद पुनर्जीवित करण्याच्या प्रतत्नांना काही प्रमाणात यश आले असून राष्ट्रवादी हा जिल्ह्यातील मोठा पक्ष ठरला आहे.

पालघर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे आमदार असून या क्षेत्रातील ११ जिल्हा परिषद जागांपैकी नऊ  जागांवर शिवसेनेने विजय संपादन केला. तर पालघर तालुक्यात १७ पैकी १० जागांवर शिवसेना उमेदवार विजयी ठरले असून पालघर पंचायत समितीचा गड राखला.

बहुजन विकास आघाडीची वसई व पालघर तालुक्यातील आपली ताकद कमी झाल्याचे दिसून आले असून जिल्हा परिषद सदस्य संख्या १० वरून चार वर घसरली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीन आमदार असलेल्या पक्षाची खरी ताकद विरार— वसई महानगरपालिका क्षेत्रात केंद्रित होत असल्याचे या निवडणूक निकालावरून दिसून येत आहे.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस पक्षाने आपले संख्याबळ गेल्या जिल्हा परिषदे इतकेच राखले आहे. निवडणुकीत उतरलेल्या मनसेला आपले खाते उघडता आले नाही. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांना गटबाजीचा तसेच काही नेतेमंडळीच्या निष्क्रियतेचा फटका काही प्रमाणात बसल्याचे दिसून आले. जिल्हा परिषदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी २९ सदस्यसंख्या आवश्यक असून ती गाठण्यासाठी महाआघाडीला शिवसेनेला सोबत घेणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेला असलेला विरोध डावलला जाऊ न सत्ता स्थापनेमध्ये शिवसेनाच अग्रस्थानी राहण्याची चिन्हे आहेत.

पालघर विधानसभा क्षेत्रात तसेच पालघर तालुक्यात पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावर यश संपादन करून पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले आहे. सत्ता स्थापनेबाबत वरिष्ठ पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.

– राजेश शहा, जिल्हा प्रमुख, शिवसेना

पालघर जिल्ह्यात राज्याप्रमाणे महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या वरिष्ठ पातळीवरू न सूचना देण्यात आल्या आहेत.  स्थानिक पातळीवर चर्चा करू न सत्ता वाटपाच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल. कम्युनिस्ट पक्ष तसेच बहुजन विकास आघाडीला महाआघाडीत सहभागासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.

– आमदार सुनील भुसारा, जिल्हा प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar district council shiv sena ncp come together for power zws

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या