डहाणू तालुक्यात कासा आणि चिंचणी भागात काही ठिकाणी टोळसदृश्य कीटक आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या किटकांविषयी जाणून घेतल्यानंतर ते मित्रकीटक असल्याचे निष्पन्न झाल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

कासा, वेती येथे चॉकलेटी रंगाचे एक इंच लांब असलेले लहान आकाराची टोळ आंबा व चिकू झाडांवर आढळून आले आहेत. हे टोळ विखुरलेल्या अवस्थेत असून टोळधाड नसली तरीसुद्धा मोठ्या संख्येने असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कासा येथील शेतकऱ्यांनी धूर केला तसेच रिकामे डबे वाजून आवाज करण्याचा प्रयत्न केला असता या झाडांवर बसलेल्या टोळावर परिणाम झाला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे चिंचणी येथे देखील काही तुरळक प्रमाणात हे कीटक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

या किटकांची छायाचित्रे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कृषी शास्त्रज्ञांकडे पाठवली असता आढळलेले कीटक हे मित्र कीटक ‘मिरिड ढेकन्या’ (Grasshopper) असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पालघर जिल्ह्यात तुरळक प्रमाणत टोळ आढळत असले तरी जिल्ह्यात टोळधाड अजूनही आली नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.