पालघर : वीज अंगावर पडून दोघांचा मृत्यू, सहा जखमी

डहाणू व वाडा तालुक्यातील घटना, जखमींवर उपचार सुरू

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

पालघर जिल्ह्यातील डहाणू व वाडा तालुक्यात आज वीज अंगावर कोसळून तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शिवाय, अन्य सहा तरूण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील तवा येथे वीज अंगावर पडून जितेश तुंबडा (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अनिल धिंडा (वय २०) हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

पालघर जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणानंतर विजेचा कडकडाट सुरू झाला आहे. दरम्यान, डहाणू तालुक्यातील तवा येथील साईबाबा मंदिर येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या दोघांवर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला.

तर,  वाडा तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावासा दरम्यान वीज अंगावर पडून अंबिस्ते येथील १७ वर्षीय सागर शांताराम दिवा या तरुणाचा मृत्यू झाला. तर त्याच्या सोबतचे अन्य पाच तरुण जखमी झाले आहेत.

वाडा तालुक्यात रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता. पावसापासून संरक्षणासाठी हे सर्व तरुण एका झाडाखाली जमा झाले होते. यावेळी सागर शांताराम दिवा या तरुणाच्या अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याच्या सोबतचे संदिप अंकुश दिवा (वय 25), अनंता चंद्रकांत वाघ (वय 24), रविंद्र माधव पवार (वय18), नितेश मनोहर दिवा (वय 19) व सनी बाळु पवार (वय 18) हे तरूण जखमी झाले. जखमी तरूणांना खानिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

डहाणू, पालघर व तलासरी भागात भूकंपाचे सातत्याने धक्के –
डहाणू शहराच्या पूर्वेच्या भागत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसल्याने डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागाला कंप जाणवला होता. अनेक नागरिक झोपेत असताना या धक्क्यामुळे भांडी, वस्तु पडल्याने खडबडून जागे झाले. नोव्हेंबर २०१८ पासून या भागात भूकंपाचे धक्के बसण्याचे सत्र सुरू झाले आहे. पावसाळ्याच्या दरम्यान धक्के बसत नव्हते, मात्र मागील पंधरा दिवसांपासून हे सत्र पुन्हा सुरू झाल्याने, या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत भूगर्भीय अभ्यास होत असून शासनाने या भागातील शासकीय कार्यालय, इमारती, आश्रमशाळा तसेच घरांच्या मजबुतीकरण करण्याचे ठरवण्यात आले आहे. मात्र ही योजना अजूनही कागदावरच राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Palghar two killed six injured in lightning strike msr

ताज्या बातम्या