रत्नागिरी: राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या तालुक्यातील पाली गावात गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. पालकमंत्र्यांच्या गावातीलच नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर आणि सत्ताधाऱ्यांच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पाली ग्रामपंचायतीअंतर्गत पाली बाजारपेठ आणि देवतळे परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पंधरा दिवसांच्या कालावधीत नागरिकांना केवळ एकदाच पाणीपुरवठा करण्यात आला असून, त्यानंतर पुन्हा नळ कोरडे पडले आहेत. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेली पाणीपुरवठा योजना आणि उपलब्ध पाणीसाठा असूनही केवळ निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, या कामाचा ठेकेदार पालकमंत्री उदय सामंत यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याची चर्चा परिसरात रंगली असून, त्यामुळेच दुरुस्तीच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
“काम निकृष्ट दर्जाचे झाले नसते तर आज पंधरा दिवस पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. पाली बाजारपेठ आणि देवतळे परिसरातील नागरिकांना पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाणी मिळाल्याने संतापाची लाट उसळली आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी संबंधित बेजबाबदार ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई करण्याचे धाडस ग्रामपंचायत आणि प्रशासन दाखवणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
एकीकडे सरकार विकासाच्या घोषणा करत असताना दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या गावातच पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची फरफट होत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका होत आहे.
