कोल्हापूर : पावसामुळे कोल्हापूर  शहराला पुराचा धोका जाणवू लागला आहे. शनिवारी पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून यंत्रणा दक्ष राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यच्या अनेक भागात शनिवारी पावसाच्या काही दमदार सरी कोसळल्या. गेल्या चार दिवसांपासून सुरु झालेल्या पावसामुळे नद्या,धरणांबरोबरच शिवारामध्ये बऱ्यापैकी पाणी झाले आहे. या  पावसामुळे सर्वच पिकांना पोषक वातावरण तयार झाल्याने बळिराजा सुखावला आहे .

कोल्हापूर जिल्ह्यत आठवडाभर पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे . येथील पंचगंगा नदी सायंकाळी इशारा पातळीवरून वाहू लागली. ३९ फूट इतकी इशारा पातळी आहे. ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने पुराचे पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांना सावध होण्याचा इशारा दिला आहे. पुराचे पाणी घरात घुसण्यापूर्वी सुरक्षित स्थळी हलण्याच्या सूचना केल्या आहेत .

हा आठवडा पावसासाठी उपयुक्त ठरला . दररोज पावसाच्या सरी  कोसळत राहिल्या . शनिवारी पावसाने अनेक भागात हजेरी लावली . पाणलोट क्षेत्रात पावसाने  झोडपले. शहरात आजही कमी – अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. सततच्या पावसामुळे  हवेमध्ये  गारठा निर्माण झाला आहे . पावसामुळे सर्वत्र दलदल पसरली होती.

आठवडाभराचा  पाऊस शेतीसाठी खूपच उपयुक्त ठरला आहे . दमदार पावसामुळे बळिराजा शेती कामांमध्ये गुंतला आहे. धुळवाफ पेरणी केलेल्या भातामध्ये भात लावणीचे काम करु लागला आहे.  शेतकऱ्यांनी खताची फवारणी केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यच्या पश्चिम भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते . भात लावणीच्या कामामध्ये शेतकरी गुंतला आहे ,मात्र त्यांना मजुरांचा तुटवडा जाणवू लागला आहे. यंदा मान्सूनने सुरुवातीला चांगली  साथ दिली. नंतर पावसाने दडी मारली . आद्र्राने  शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाचा मारा केला. आता पुनर्वसूने चांगलाच हात दिला आहे.