scorecardresearch

पंढरीच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू

लाखो वैष्णवांना विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची लागलेली आस अखेर  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्ण झाली.

पंढरपूर : लाखो वैष्णवांना विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनाची लागलेली आस अखेर  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पूर्ण झाली. करोनामुळे गेले दोन वर्षे बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन आजपासून सुरू करण्यात आले. या वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे गुलाब फुल देऊन स्वागत केले. तसेच मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.  गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल मंदिराचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले. त्यावेळी रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले.

 गुढीपाडवा या सणानिमित्त मंदिरातील भगवा ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पुणे जिल्ह्यातील चिखली येथील भाविक नाना बबन मोरे,नवनाथ नामदेव मोरे यांनी झेंडू, शेवंती, गुलछडी, ओरकीट, गुलाब, तगर आदी गुलांच्या रंगसंगती आणि अननस, डाळिंब, किलगड, सफरचंद, संत्र असे अंदाजे ११० किलो फळ तर २ टन फुले वापरण्यात आली. आता या पुढे भाविकांना पदस्पर्श, मुखदर्शन घेता येणार आहे. तसेच भाविकांना ऑनलाइन दर्शन बुकिंग देखील करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे. पदस्पर्श दर्शनामुळे मंदिराचे आणि पंढरीच्या अर्थकारणाला चालना मिळेल.

नित्य, पाद्य आणि चंदन पूजेला सुरुवात

गेली दोन वर्षांपासून देवाच्या नित्य, पाद्य आणि चंदन पूजा बंद होत्या. दोन वर्षांपूर्वी जवळपास २६० भाविकांनी पूजेचे पैसे समितीकडे जमा केले होते. त्यांना प्राधान्य देणार आहेत. तसेच गुढीपाडव्यापासून देवाला चंदन पूजा केली जाते. त्यापण सुरू करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandhari vithuraya padasparsh darshan begins of gudipadva at the moment ysh