२९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार आहे. त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये, म्हणून चोख नियोजन करण्याचे आदेश गुरूवारी ( १ जून ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोलमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूरच्या वारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण आणि विविध अधिकारी उपस्थित होते. यावर्षी वारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. वारी मार्गावर पाण्याच्या उपलब्धतेबाबत विषेश नियोजन करावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीची कमतरता भासणार नाही, असे चोख नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

हेही वाचा : “शिंदेंचं सिंहासन लवकरच…” मुख्यमंत्री आणि पवारांच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रातील राजकारण…”

वारीत सहभागी होणाऱ्या वाहनांना टोला द्यावा लागू नये, यासाठी पोलीस विभागाने स्टीकर किंवा पासच्या माध्यमातून कार्यवाही करावी. टोल नाक्यांवर विशेष व्यवस्था करून, वारकऱ्यांना टोल द्यावा लागू नये, असं नियोजन करावे. पालखी मार्गावरील टोल नाके सुरु होणार नाहीत. त्याबाबत केंद्रीय मंत्री नितीश गडकरी यांच्याशी संपर्क साधून त्यांना कल्पना दिल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :  “रायगडावरील शिवसृष्टीसाठी ५० कोटी देणार”, शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा, प्रतापगडच्या संवर्धनाकरताही महत्त्वाचा निर्णय

वारी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीने तंबू-निवारे उभे राहतील, पंखे आणि सावली यासाठी काळजी घ्यावी. वैद्यकीय पथके, तज्ज्ञ आणि रुग्णवाहिकांची सज्जता ठेवावी. औषधे पिण्याचा पाणी, अन्न आरोग्यसुविधा याबाबत वेळीच नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur ashadhi ekadas toll free for varkari say cm eknath shinde ssa
First published on: 02-06-2023 at 15:15 IST