पंढरपूर : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर येथील श्री विठ्ठल आणि रखुमाईचे व्हीआयपी दर्शन आजपासून बंद ठेवण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत कोणत्याही लोकप्रतिनिधी, वरिष्ठ शासकीय अधिकारी किंवा मंदिर समिती सदस्यांच्या शिफारसी पत्र किंव अन्य मार्गाने व्हिआयपी प्रवेश दिला जाणार नाही. याचा उल्लंघन करून प्रवेश देणार्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार असे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी दिले आहेत. तर उद्या म्हणजे १६ जुलैपासून विठ्ठलाचे २४ तास दर्शन सुरु राहणार आहे.
ऊन वारा पाउस याची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेवून पंढरीकडे लाखो भाविक येतात. सर्व संतांचा पालखी सोहळा पंढरपूरच्या समीप आला आहे. या पार्श्वभूमीवर गेली दोन महिने वारीच्या नियोजन करणार्या प्रशासनाची आता अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे.
आषाढी सोहळ्यासाठी देश विदेश , राज्यातून भाविक मोठ्या संख्यने पंढरीकडे येतात. देवाचे पददर्शन घेण्यासाठी भाविक रांगेत उभे असतात. त्यामुळे आज पासून म्हणजेच १५ जुलै पासून श्री विठ्ठल आणि रखुमाईचे व्हीयापी दर्शन सेवा बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत. आज पासून ते २९ जुलै पर्यंत ही सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच याची देखरेख करण्यासाठी सीसीटीव्ही, दोन अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. राजकीय, सामाजिक, प्रशासकीय , पोलीस, पत्रकार आदींनी यात्रा कालवधीत व्हीआयपी दर्शनाचा आग्रह न धरता रांगेतून,मुख, कळस दर्शन घेवून सहकार्य कारावे आसे आवाहन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी केले आहे.
आषाढी यात्रेत देवाचे नवरात्र बसविले जाते. याला शेकडो वर्षाची परंपरा आहे. उद्या म्हणजे १६ जुलै रोजी देवाचा पलंग काढला जातो. वारीसाठी भाविकांच्या दर्शनला देव चोवीस तास उभा राहतो. देवाला उभे राहून त्रास होऊ नये, पाठीला आराम मिळावा म्हणून लोड लावला जातो अशी भावना वारकर्यांची आहे. पुढे पौर्णिमा झाल्या नंतर देवाचा शिणवठा प्रक्षाळपूजा केल्यावर काढून देवाचा पाठीचा लोड काढला जातो आणि पलंग ठेवण्याची परंपरा आहे. उद्यापासून देवाचे नित्योपचार वगळता २४ तास दर्शन सुरु राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले.दरम्यान,जसे भाविक दर्शनासाठी आसुसलेले आहेत तसेच विठूराया देखील भाविकांना भेटण्यासाठी २४ तास उभा राहणार आहे.
आज पासून पंढरीत मांस विक्री बंदी : प्रांताधिकारी इथापे
आषाढी यात्रा कालावधीत या आधी तीन ते चार दिवस मांस विक्री बंदी होत होती. मात्र यंदा पहिल्यांना १५ जुलै ते २९ जुलै अखेर या कालावधीमध्ये मांस, मटण, मासे विक्री व प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी बंदी आदेश जारी केले आहे. वारकरी संप्रदाय, महाराज मंडळीने मांस विक्री बंदीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा पंढरपूर शहर व परिसरात मांस बंदीचे आदेश काढले आहेत.
