पंढरपूर : राज्याच्या २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी ५०१ कोटी १६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर केलेल्या अर्थसंकल्पात मतदारसंघासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद होणे ही ऐतिहासिक बाब असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात विविध विकासकामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात ६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच वाखरी-टाकळी-अनवली-मुंढेवाडी रिंग रोडसाठी २१८ कोटी रुपये, गुंजेगाव-तनाळी-कासेगाव ते पंढरपूर रस्त्यासाठी ३१ कोटी ५० लाख, तर गोपाळपूर-रांझणी-ओझेवाडी मार्गासाठी ३८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय पंढरपूर ठाकरे चौक ते टाकळी रोड उड्डाणपुलासाठी ५० कोटी १६ लाख, मुंढेवाडी-अजनसोंड रस्त्यावर भीमा (चंद्रभागा) नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी ३२ कोटी ५० लाख, तसेच दगडी पुलाशेजारी दुसरा पूल उभारण्यासाठी ४५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील अनेक ग्रामीण रस्त्यांची सुधारणा व रुंदीकरणासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.
दर वर्षी येणाऱ्या लाखो भाविकांना दिलासा मिळणार आहे. तसेच सिंचन, रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन शेतकरी व नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले. या निधीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच संबंधित मंत्र्यांचे सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.
विकासाला गती देणारा अर्थसंकल्प : माजी आमदार परिचारक
पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वाखरी ते पंढरपूर या अंदाजे ८ किमी रस्ता चौपदरीकरण व रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने ‘खास बाब’ म्हणून १२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या कामामुळे पंढरपूर शहरात प्रवेश करताना होणारी वाहतूककोंडी कायमची दूर होणार आहे. या कामांमुळे तालुक्याच्या दळणवळण व्यवस्थेला नवी दिशा मिळेल. तालुक्याच्या विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प असून, तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रशांत परिचारक यांनी सरकारचे आभार मानले.
