यंदा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

गेली दोन वर्षे करोनामुळे वारी झाली नाही या भावनेतून यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळय़ात वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे यांनी व्यक्त केली.

वाई : गेली दोन वर्षे करोनामुळे वारी झाली नाही या भावनेतून यंदाच्या आषाढी वारी पालखी सोहळय़ात वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे यांनी व्यक्त केली. आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर सातारा जिल्ह्यात सहा दिवस मुक्काम आहे. या अनुषंगाने पालखी सोहळय़ाचे मुक्काम, विश्रांती, भोजन, रिंगण सोहळे आणि इतर परंपरागत ठिकाणांची पाहणी करण्यात आली. सातारा जिल्ह्यात लोणंद (ता. खंडाळा) येथील पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, आरफळकर मालक संस्थानाचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर आणि इतर मानकऱ्यांनी माउलींच्या पालखी मार्गाची पाहणी केली.

गेली दोन वर्षे करोनाच्या निर्बंधामुळे वारी सोहळा हा काही मोजक्या लोकांमध्ये लालपरीतून (एसटीतून) जाऊन पार पडला होता. प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने निर्बंध हटवले आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर आषाढी पायी वारी होणार आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठय़ा उत्साहाचे वातावरण असून, वारकरी तयारीला लागले आहेत. यंदा जेजुरीचा पालखी तळ बदलला आहे. जेजुरीत नवीन तळावर पालखी उतरणार असून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचणीची पाहणी करण्यात आली.

  •   या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आळंदी येथून २१ जूनला प्रस्थान करणार आहे.
  • २८ जून रोजी पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून २८ व २९ जून लोणंद मुक्काम, ३० जूनला तरडगाव (ता. फलटण) येथे पालखी सोहळय़ातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा निंब येथे होईल. १ व २ जुलै फलटण येथे मुक्काम आहे.
  • ३ जुलै रोजी बरड (ता. फलटण) असे सहा पालखी सोहळय़ाचे मुक्काम साताऱ्यात संपवून  ४ जुलै ला सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
  • पालखी सोहळा सहा दिवस जिल्ह्यात राहणार असल्याने प्रशासनाला सातारा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा, कोकण परिसरातून होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने नियोजन करावे लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pandharpur numbers increase possibility palkhi ceremony ysh

Next Story
वाळू तस्करांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यल्प
फोटो गॅलरी