पंढरपूर : शेकडो किलोमीटरचे अंतर पायी चालत निघालेल्या संतांच्या पालख्या शनिवारी पंढरीत पोहोचल्या. वैष्णवांची मांदियाळी आणि हरिनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली. उद्याच्या आषाढी एकादशीसाठी राज्य आणि परराज्यातून तब्बल १५ लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. रविवारी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करणार आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यासह अनेक संतांचे पालखी सोहळे शुक्रवारी रात्रीच वाखरी मुक्कामी दाखल झाले होते. आज सकाळी या पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील अखेरचा रिंगण सोहळा दुपारी वाखरी येथे पार पडला. त्यानंतर संत मुक्ताई आणि संत नामदेव महाराज यांच्यासह मानाच्या पालख्या वाखरी येथे दाखल झाल्या. सर्व संतांची भेट झाली. त्या नंतर क्रमाक्रमाने पालख्या पंढरीकडे मार्गस्थ झाल्या. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वाखरी येथून पुढे भाटे यांच्या रथातून मार्गस्थ झाली. पंढरपूरच्या जवळ आल्यावर सरदार शितोळे यांनी माउलींच्या पादुका गळ्यात घेत मार्गक्रमण केले.
वाखरीच्या रिंगण सोहळ्यासाठी पंढरपूरहून भाविक जातात. ज्या भाविकांना पालखी सोहळ्यात सहभागी होता येत नाही असे हजारो भाविक वाखरी ते पंढरपूर पायी चालत येतात. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने शहरात येणाऱ्या सर्व संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्यात आले. पंढरीत प्रवेश केल्यानंतर प्रत्येक संतांच्या पालख्या आपआपल्या ठरलेल्या मंदिरात विसावल्या. मठ, मंदिरे संतभाराने गजबजले. हजारो वैष्णवांच्या टाळ-मृदंग आणि ग्यानबा तुकारामच्या जयघोषाने पंढरी नगरी दुमदुमून गेली. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या वारीनंतर आता भाविकांना त्यांच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस लागली आहे.