पंढरपूर : लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या सावळ्या विठुरायाच्या चंदन पुजेची सुरवात चैत्र महिन्यात सुरवात होणार आहे. या पुजेची ऑनलाईन बुकिंग उद्या म्हणजे १३ मार्च पासून सुरु होणार आहे. हि पूजा १९ मार्च ते ८ जून म्हणजेच चैत्र पाडवा ते मृग नक्षत्र प्रारंभ पर्यंत भाविकांना करता येणार आहे. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून पूजा करण्याची नोंदणी करता येणार असल्याचे त्यांनी माहिती दिली.

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढत आहे. पुढे यात आणखीन वाढ होणार आहे. त्यामुळे उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी डोक्यावर तो,रुमाल बांधणे, डोळ्यावर गॉगल असे सर्वसामन्य परिधान करतात. मग देवाला वाढत्या उष्णतेसाठी त्रास होऊ नये म्हणून शेकडो वर्षापासून चालत आलेली पारंपारिक पद्धतीचे आजही पंढरीत जतन होत आहे. ग्रीष्म ऋतूमध्ये वाढणाऱ्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर श्रींच्या मूर्तीची शीतलता लाभावी या परंपरेनुसार चंदन उटी पूजा केली जाते. चंदन हे शीतल म्हणजे थंडावा देणारे आहे.

देवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावला जातो . हा लेप लावताना देवाची शोडोपचार पूजा केली जाते. या पूजेसाठी राज्यासह पर राज्यातील भाविक मोठ्या संखेने सहभागी होतात. यंदा चंदनउटी पूजेचा कालावधी १९ मार्च ते ८ जून २०२६ (अंदाजे) म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते ज्येष्ठ शुद्ध षष्ठी अथवा मृग नक्षत्र प्रारंभ होईपर्यंत असा कालवधी निश्चित करण्यात आला आहे.

हि पूजा श्रींच्या पोषाखानंतर दुपारी ४.३० ते ५.१५ या वेळेत करण्यात येणार आहे. या पूजेसाठी भाविकांना घरबसल्या नोंदणी करता यावी यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १३ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळाद्वारे पूजेची नोंदणी करता येणार आहे. भाविकांनी https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करावी, असे आवाहन मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह,भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले आहे. करण्यात आले आहे. श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेसाठी अनुक्रमे २१,०००/- व रु.९,०००/- रुपये इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे.

ऑनलाईन नोंदणी करताना अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयामार्फत मार्गदर्शन व नोंदणीस सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूजेबाबतची सविस्तर माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठीभाविकांनी दूरध्वनी क्र. ०२१८६-२९९२९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.