पंढरपूर : आज पर्यंत अनेक विवाह सोहळे झाले,होतील.पण जर देव देवतेचा विवाह असेल तर…असाच एक विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर येथील श्री विठ्ठल आणि रख्मिणीचा संपन्न झाला तोही शाही पद्धतीने. मंगल अक्षता, सनई चौघडे आणि उपस्थित व-हाडी मंडळींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला.वसंत पंचमी ते रंगपंचमी पर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे.त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला.दरम्यान, या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली.

वसंत पंचमीला श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह झाल्याचा उल्लेख संत एकनाथ महाराजांनी लिहलेल्या रुख्मिणी स्वयंवरात आहे.हा विवाह सोहळा पूर्वी उत्पात समाज करीत होते.त्यानंतर आता मंदिर समिती श्री विठ्ठल मंदिरात तर उत्पात समाज वशिष्ठ आश्रम येथे या दिवशी हा सोहळा करून परंपरा जपत आहे.हा विवाह सोहळा दिमाखदार करण्यासाठी म्हणून संपूर्ण देऊळ विविध रंगीबेरंगी फुलांनी सजविले होते.श्री विठ्ठल आणि रुख्मिणीला शुभ्र वस्त्र तर रुख्मिणी मातेस मोत्याचे दागिने,नथ,हिरवा चुडा आणि शुभ्र अलंकाराने नवराई नटली होती.

साधारणता सकाळी अकरा वाजता रुख्मिणीमातेच्या गर्भगृहातून गुलाल श्री विठ्ठलाकडे नेला.तिथे गुलालाची उधळण झाली.त्यानंतर विठ्ठलाचा गुलाल रुख्मिणीमाते कडे घेवून गेले.तिथेही गुलालाची उधळण झाली.त्यानंतर श्री विठ्ठल आणि रुख्मिणीचे अलंकाराने सजविलेली उत्सव मूर्ती या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आणले. दोघानाही मुंडावळ्या बांधून आणल्या. वऱ्हाडी म्हणजेच भाविक जमा झाले.

उपस्थितीताना फुल आणि अक्षता वाटप केले.मुलीचे मामा…मुलीला घेवून या असे पुकारले.अंतरपाट धरला. आणि सुरु झाल्या मंगलाष्टका… आणि मग आता सावध सावधान … हि मंगलाष्टक म्हणल्यावर सर्व उपस्थित टाळ्या वाजवून आणि टाळ-मृदुंगाच्या जयघोषात आपल्या लाडक्या देवाचा विवाह सोहळा झाल्याचा आनंद साजरा केला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर,कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच समिती सदस्यासह भाविक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वास्तविक पाहता शिशिर ॠुतु म्हणजे थंडी संपून वसंत ॠुतु.म्हणजे उन्हाळा सुरु होतो.सतत सुंदर भासणारा निसर्ग, वसंत ऋतू सोळा कलांनी फुलून उठतो.वसंत ऋतू च्या आगमनाने सर्व सृष्टी फुलून जाते.सर्वत्र चैतन्याचे वातावरण तयार होते. या दिवशी रती आणि कामदेव च्या पूजेचा मानल जाते.वसंत ऋतूच्या आगमनाने सर्व सृष्टीमध्ये चैतन्य असल्याचे हे प्रतिक आहे.या ॠुतु मध्ये पांढरे वस्त्र परिधान केले तर उन्हाची तीव्रता कमी होते.शेकडो वर्षापासून वारकरी संप्रदायात रूढी बरोबर विज्ञाना ची जोड जोपासली जात आहे.असे असले तरी वारकरी सांप्रदायात अनेक परंपरा आजही जपल्या जात आहेत.

विठठलाची रंगपंचमी सुरू

वसंतपंचमीपासून ते रंगपंचमीपर्यत विठठलास पांढरा शुभ्र वेष परिधान करण्यात येत असतो. या काळात दररोज गुलालांची उधळण भगवंताच्या अंगावर केली जाते. वसंतपंचमी पासून ते रंगपंचमी पर्यंत म्हणजे एक महिना विठ्ठलाची रंगपंचमी सुरु राहणार.या रंगपंचमी उत्सवाचा शुभारंभ वसंतपचंमीच्या निमित्ताने झाला.सावळा विठूराया आणि रुक्मिनिमातेस पांढ-या शुभ्र वेषात दिसणार आहे.