पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या विविध पूजांसाठी बुधवारपासून (दि. २५) संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत होणाऱ्या पूजेसाठी असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. यापूर्वी करण्यात आलेल्या ‘ऑनलाईन’ नोंदणीस राज्यासह परराज्यांतील भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व तुळशी अर्चन पूजा इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. याबाबत मंदिर समितीच्या ३ मार्च २०२४ रोजी, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत, संकेतस्थळावरूनदेखील पूजेची ‘ऑनलाईन’ नोंदणी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org किंवा nhttps://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.
मंदिर समितीच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला जी पूजा करावयाची आहे ती पूजा, महिना आणि तारीख यांची निवड करायची. जर त्या तारखेला अगोदरच नोंदणी असेल, तर उपलब्धतेप्रमाणे पर्यायी तारखेला नोंदणी करता येते.
आता १ एप्रिल ते ३१ जुलै २०२६ या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व महानैवेद्य सहभाग योजना, तसेच एप्रिलमधील तुळशी अर्चन पूजेसाठी ‘ऑनलाईन’ नोंदणीची सुविधा भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ऑनलाईन’ नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समिती कार्यालयाशी (०२१८६-२९९२९९) संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विविध पूजा आणि देणगी मूल्य
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेच्या नित्यपूजेसाठी अनुक्रमे २५ हजार व ११ हजार रुपये. तसेच पाद्यपूजेसाठी पाच हजार रुपये व तुळशी अर्चन पूजेसाठी दोन हजार १०० रुपये. महानैवेद्य सहभाग योजनेसाठी सात हजार रुपये इतके देणगी मूल्य आहे.
