पंढरपूर : श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या चंदन उटी पूजेची सांगता झाली. देवाला म्हणजेच परमात्मा पांडुरंगाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चैत्र पाडवा ते मृग नक्षत्र या कालावधीत शीतलता मिळावी म्हणून चंदन लावण्याची परंपरा आहे. यंदा या पूजेचे बुकिंग संकेतस्थळावरून करण्यात आले होते. मंदिर समितीला या माध्यमातून ३५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
येथील श्री विठ्ठल आणि रखुमाईला ऋतूप्रमाणे आहारविहार ठेवण्याची शेकड वर्षांची परंपरा आहे. उन्हाळ्यात देवाला पांढरा पोशाख, तर थंडीत शाल, कानपट्टी अशा परंपरा आजही जपल्या जात आहेत. श्री विठ्ठलाला उन्हाचा त्रास होऊ नये, त्याची तीव्रता कमी व्हावी, थंडावा मिळावा या भावनेतून ही चंदन उटी पूजा केली जाते. विठुरायाप्रमाणे रुक्मिणी मातेला देखील या पद्धतीने चंदन उटी लावण्यात येते. या चंदनउटी पूजेची सांगता पूजा झाली.
श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेची चंदनउटी पूजा अनुक्रमे सदस्या ॲड्. माधवीताई निगडे व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसेच सदस्य ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर) व व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी सदस्या शकुंतला नडगिरे, विभागप्रमुख पांडुरंग बुरांडे, सहायक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे उपस्थित होते.
यंदा प्रथमच, भाविकांना श्रींची चंदनउटी पूजा ऑनलाइन पध्दतीने बुकिंग करण्यास उपलब्ध करून दिली होती. त्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या पूजेच्या माध्यमातून मंदिर समितीला सुमारे ३५ लाख १३ हजार इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. त्यामध्ये श्री विठ्ठल व श्री रुक्मिणीमातेकडे अनुक्रमे रुपये २१ हजार व ९ हजार इतके देणगीमूल्य होते.
३० मार्च ते १३ जून कालावधीत एकूण पूजेचे ७६ दिवस उपलब्ध झाले होते. त्यामध्ये श्री विठ्ठलाकडे १२१ व रुक्मिणीमातेकडे १०८ पूजा उपलब्ध झाल्या होत्या. या पूजेसाठी अंदाजे ९० ते ९५ किलो चंदनाचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, चंदनउटी पूजेच्या सांगतेनिमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये विशेष भोजन व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये सुमारे २००० ते २५०० भाविकांनी लाभ घेतला. असे असले तरी देवाची परंपरा आणि विज्ञानाची जोड असून शेकड वर्षांची परंपरा आजही जोपासली जात आहे.