मंदार लोहोकरे, लोकसत्ता

पंढरपूर : राज्यातील करोना आटोक्यात येत असताना सरकारने कार्तिकी यात्रेला करोनाचे नियम पाळून यात्रा भरण्यास परवानगी दिली. करोनामुळे सलग सहा वारींवर निर्बंध होते. त्या वेळेस वारकरी संप्रदायाने संयमी भूमिका घेतली. यंदाच्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी शिस्त, नियमाचे पालन केले. दीड वर्षांनंतर टाळमृदुंगाचा जयघोष, हरिनामाचा जयजयकार, तर भक्तांच्या मांदियाळीने पंढरी नगरी पुन्हा दुमदुमून निघाली.

समतेची पताका खांद्यावर घेऊन जाणारे वारकरी हे अतिशय शिस्तप्रिय. कोणतेही आमंत्रण लागत नाही. दरवर्षी आषाढी यात्रेला पायी, तर कार्तिकी, माघी आणि चत्री यात्रेला वारी पोहोचती करणे हा शिरस्ता. शेकडो वर्षांची परंपरा जोपासत कोणीही उच्च नाही, बंधुभाव ही शिकवण, परंपरा पुढे चालवत आहेत. मात्र करोनामुळे शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली. या काळात वारकरी संप्रदायाने संयमी भूमिका घेतली. वारीसाठी आग्रह धरला, पण सरकारला वेठीस धरले नाही.

कार्तिकी यात्रेबाबत स्थानिक प्रशासनाने वारी भरली तर काय सुविधा देता येईल याची तयारी केली. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला. स्थानिक व्यापाऱ्यांना सलग सहा वारींवर निर्बंध आल्याने पंढरीच्या अर्थकारणाला खीळ बसली. त्यामुळे जर वारी भरली तर थोडी फार ऊर्जा मिळेल अशी आशा व्यापाऱ्यांना वाटू लागली. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यास जवळपास दोन लाख भाविक पंढरीत दाखल झाले होते.

यात्रेसाठी आलेल्या भाविकांना ठिकठिकाणी आरोग्य केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छता यासाठी विशेष सुविधा स्थानिक प्रशासनाने दिल्या. चंद्रभागा नदीच्या पलतीरावरील भक्ती सागर या ठिकाणी भाविकांसाठी राहुटय़ांची सोय केली. तसेच शहरात ५ ठिकाणी लसीकरण केंद्रे उभी केली. त्यामुळे येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक आदर्श स्थानिक प्रशासनाने घालून दिला, तर वारीला पंढरीला जायचे, वाळवंटात भजन-कीर्तन करायचे, दर्शनरांगेतून सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस भाविकांना लागली. गेली दीड वर्ष मंदिर परिसर, मठ, रस्ते या ठिकाणी नीरव शांतता होती. ते ठिकाण पुन्हा गजबजून गेले. मंदिर परिसरात भाविकांची गर्दी, वाळवंट, मठ भक्ती सागर येथे टाळ-मृदुंग आणि भजन-कीर्तनाने परिसर भक्तीमय झाला. गेली दीड वर्ष नीरव शांतता अनुभवलेल्या शहरवासीयांना पुन्हा ती भाविकांची गर्दी, टाळ-मृदुंगाचा जयजयकार आणि कानी पडणारे कीर्तनाचे आणि माउली माउली असे बोल याने स्थानिकदेखील भारावले. ज्या वारकरी संप्रदायाने विश्वाची प्रार्थना केली त्याच वारकऱ्यांनी संयम दाखवला. त्याच शिस्तप्रिय वारकऱ्यांनी करोनाचे नियम पाळून पुन्हा एक आदर्श निर्माण केला.

कार्तिकी वारीसाठी शहरात सात ठिकाणी आरोग्य पथक तनात ठेवले होते. तसेच मंदिरातील संत ज्ञानेश्वर सभा मंडप येथे सुसज्ज दवाखाना उभारला आहे. तसेच शहरात पाच ठिकाणी २४ तास लसीकरण केंद्रे उभारली. दि. ११ ते १५ नोव्हेंबर या काळात ३२३ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. यात एक जण करोनाबाधित आढळला. तसेच १३४१ जणांचे लसीकरण झाले.

– गजानन गुरव, पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी

वारकरी या कार्तिकी यात्रेसाठी उत्साहात दाखल झाला. एसटीच्या संपाचा अडथळा येऊनसुद्धा अनेक वारकऱ्यांनी खासगी वाहनाने पंढरी गाठत आपली भक्तितृष्णा भागवली व आता पुन्हा कधीही आयुष्यात ‘वारी चुको नेदी हरि।’ अशी आर्त विनवणी पांडुरंगाच्या चरणी केली.

– रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, राष्ट्रीय प्रवक्ता, वारकरी संप्रदाय पाईक संघ

करोनामुळे आधी टाळेबंदी, त्यात सहा वारींवर निर्बंध लादले. त्यामुळे पंढरीतील व्यापाऱ्यांना फटका बसला. वारीवर येथील अर्थकारण अवलंबून आहे. यंदा कार्तिकी यात्रा भरली. अपेक्षेपेक्षा कमी भाविक आले; पण सुरुवात तर झाली. वारी झाली तर स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होईल.

– नानाशेठ कवठेकर, व्यापारी