|| संजय बापट

मोठा भाऊ  असूनही धनंजय मुंडे यांच्यामुळे जीवनात संघर्ष करावा लागला. मुंडे साहेबांचे कार्य पुढे नेताना या संघर्षांतून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले. माझा संघर्ष आता संपला असून धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी चर्चा करताना मुंडे यांनी आपल्याला केवळ ओबीसींचे नाही तर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे असल्याचेही सांगितले. राष्ट्रवादी आपल्याला मंत्री करेल म्हणून धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने त्यांना काही दिले नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले, असा टोला पंकजा मुंडे यांनी लागावला.

ज्यावेळी वडील गोपीनाथ मुंडे गेले, त्यावेळी मोठा भाऊ  म्हणून धनंजय यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता, कुटुंबाला आधार दिला असता तर  कदाचित आज वेगळे चित्र असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला त्रास दिला.

विरोधी पक्षनेतेपदाचा वापरही त्यांनी केवळ मला त्रास देण्यासाठीच केला. पण त्या आरोपातून मी तावून सुलाखून बाहेर पडले. या काळात माझा पक्ष  पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता माझा राजकीय संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.