“मुंडे साहेबांना तर शपथही घेता आली नव्हती”, पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत झाल्या भावुक!

प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीच्या रेकॉर्डब्रेक विजयाबद्दल बोलताना पंकजा मुंडे भावुक झाल्या. “पक्षासाठी पायाला पट्ट्या बांधून प्रचार केलाय”, असं त्या म्हणाल्या.

pankaja munde on gopinath munde pritam munde
गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीत पंकजा मुंडे झाल्या भावुक!

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रात मुंडे भगिनी नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांचं देखील नाव होतं. मात्र, त्यांना मंत्रीपद मिळू शकलं नाही. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी अभिनंदनाचं ट्वीटदेखील केलं नसल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना अधिकच उधाण आलं. मात्र, नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या या सर्व मुद्द्यांवर बाजू मांडत होत्या. मात्र, यावेळी बोलताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने त्या भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. खासदारकी किंवा मंत्रिपदाविषयी बोलताना त्यांचा गळा गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने दाटून आला.

“मी पायाला पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केलाय”

प्रीतम मुंडे यांनी रेकॉर्डब्रेक मतं मिळवून दोन टर्म खासदारकी जिंकूनही त्यांना डावललं गेल्याचा मुद्दा उपस्थित होताच पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंसोबतची एक आठवण सांगितली. ही आठवण सांगताना त्या गहिवरल्या. “गोपीनाथ मुंडे निवडून आले, त्या निवडणुकीला मी एकटीच होते. आमच्या इथे जिल्ह्यात आमदार नव्हता. माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून पक्षाचा प्रचार केला आहे”, हे सांगताना त्यांचा गळा दाटून आला होता. “प्रीतमताई वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या, ती निवडणूक त्या त्यांच्या मेरिटवर जिंकल्या. तरीही प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार आहेत की नाही इथून चर्चा होते”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात निष्ठावंतांना डावलण्यात आलं का?; पंकजा मुंडे म्हणतात…

“शपथ घेण्याआधीच मुंडे साहेब गेले”

दरम्यान, २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं. मात्र, खासदारकीची शपथ घेण्याआधीच त्यांचं अपघाती निधन झालं. याविषयी बोलताना देखील पंकजा मुंडेंना गहिवर अनावर झाला. “मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि ३ जूनला ते गेले. गंमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते. पण मुंडे साहेबांच्या शेवटच्या टर्मची मिळत नाही. कारण त्यांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घेण्याआधीच गेले. १७ दिवसांत ते गेले. हे केवढं मोठं घोर दु:ख आहे. प्रीतम मुंडे राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या. त्या लोकांना शांत करण्यासाठी आल्या”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने नाराज असल्याच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाल्या….

एक जरी मत वाढत असेल, तरी नव्या मंत्र्यांचं स्वागत!

बाहेरून पक्षात आलेल्या व्यक्तींना मंत्रीपद मिळाल्याची देखील चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे यांनी त्याचं समर्थन केलं आहे. “आम्ही जे कष्ट केलेत ते पक्षासाठीच केले. माझ्याकडे येणारी गर्दी पक्षासाठीच आहे. त्यामुळे मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा आहे असं मी म्हणून शकत नाही. मंत्रीपद मिळालेल्या लोकांमुळे भाजपामध्ये १ मतही वाढत असेल, तर त्यांचं स्वागतच आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pankaja munde bjp gets emotional on cabinet expansion pritam munde gopinath munde pmw