scorecardresearch

अनेकदा डावलल्याची आणि नाराजीची चर्चा, पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? त्या म्हणाल्या, “वर्षभरात…”

Pankaja Munde Dasara Melava : : पंकजा मुंडे यांचा आज (५ ऑक्टोबर) भगवान गडावरील दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात काय बोलणार असा प्रश्न पत्रकारांनी पंकजा मुडेंना विचारला.

अनेकदा डावलल्याची आणि नाराजीची चर्चा, पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलणार? त्या म्हणाल्या, “वर्षभरात…”
पंकजा मुंडे (संग्रहीत छायाचित्र)

Pankaja Munde Dasara Melava : राज्यसभेची निवडणूक असो की विधान परिषदेची निवडणूक, अगदी शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईपर्यंत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा मागील वर्षभरात अनेकदा होत्या. मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडेंना डावलल्याचा आरोपही केला. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा आज (५ ऑक्टोबर) भगवान गडावरील दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यात काय बोलणार असा प्रश्न पत्रकारांनी पंकजा मुडेंना विचारला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “दसरा मेळाव्यातील भाषणाचे मुद्दे मी ठरवलेले नाहीत. पुढील दोन तासात तुम्हाला ते कळतील. या वर्षभरात अनेक घटना असतात. त्या घटनांमध्ये माझ्यावर राज्यभरात प्रेम करणारे भाऊ सैनिकाप्रमाणे उभे राहतात. त्या घटनांवर माझ्या तोंडून थेट बोललं गेलं तर त्यांना आधार वाटतो. या वर्षभरात जे काही झालं त्यावर आम्ही दसरा मेळाव्यात बोलतो.”

“या मेळाव्याचा विषय केवळ जिल्ह्याचा नसून राज्यातील प्रमुख वंचितांचा”

तसेच भविष्यात वर्षभर आपण काय करायचं यावर काही सूचना वजा विनंती करते. तशीच वर्षभर आम्ही आमची वाटचाल करत असतो. हा दसरा मेळावा राज्यभरातील लोकांसाठी असतो. देऊळगावराजा, सिंदखेडराजा, बुलडाणा, वाशी, जळगाव, अगदी पश्चिम महाराष्ट्रातून लोक येतात. त्यामुळे या मेळाव्याचा विषय केवळ जिल्ह्याचा नसून राज्यातील प्रमुख वंचितांचा असतो,” असं मत पंकडा मुंडेंनी व्यक्त केलं.

“त्यांना काय ऐकायचं आहे ते मला द्यावं लागतं”

“मागीलवेळी मी जाहीर केलं होतं की आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही. ते सत्यात उतरलं आहे. ते आमच्यासाठी आनंद साजरा करण्याचा मुद्दा आहे. या मेळाव्यात जो प्रचंड उत्साह असतो. त्यामुळे त्यांना काय ऐकायचं आहे ते मला द्यावं लागतं,” असंही मुंडेंनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकायला उत्सूक आहात?

उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेंचं भाषण ऐकायला उत्सूक आहात? या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी सकाळीच सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण ऐकलं. सकाळी उठल्या उठल्या चांगला संदेश हा मिळाला की, त्या कार्यक्रमाची प्रमुख एक महिला होती. महिलांना काहीतरी स्थान मिळालं हा एक शुभ संकेत होता. मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते.”

“खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा”

“दुसरीकडे एकदम वेगळा दसरा मेळावा जिथं खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा आहे. त्यामुळे हे तीन वेगवेगळे मेळावे होत आहेत आणि मोहन भागवत यांचं मार्गदर्शन असा हा दिवस वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे. जनता हुशार आहे, ते सर्व पाहत आहेत,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं.

हेही वाचा : पंकजा मुंडेंना शिंदे गटात घेण्याचा विचार करणार का? अब्दुल सत्तार म्हणाले, “एखाद्या नेत्यामुळे…”

“”शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते, कारण…”

“शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सिमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्याचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्ही सावकरगावचं आमचं भगवान बाबांचं मंदिर बघितलं पाहिजे. आम्ही अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर उभं केलं आहे. तसंच मी या दोघांकडे कुतुहलाने बघते. आज त्यांच्यासाठी सिमोल्लंघनाचा खरा दिवस आहे. ते विषयांचं आणि जनतेच्या प्रश्नांचं सिमोल्लंघन करतील अशी अपेक्षा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या