scorecardresearch

“त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले.

“त्यांना काय बोलायचं होतं हे त्यांच्यासोबतच गेलं,” विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी व्यक्त केले दु:ख
पंकजा मुंडे आणि विनायक मेटे

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांचे आज (१४ ऑगस्ट) अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ हा अपघात झाला. विनायक मेटे यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीदेखील या घटनेनंतर दु:ख व्यक्त केलं आहे. विनायक मेटेंकडून मला भेटण्यासाठीचा निरोप आला होता. १५ ऑगस्टनंतर आम्ही भेटणार होतो. मात्र त्यांना काय बोलायचे होते, हे त्यांच्यासोबतच गेले आहे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी दु:ख व्यक्त केले. त्या ”टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा >>> Vinayak Mete Car Accident : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटेंचं अपघाती निधन; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला भीषण अपघात

“चंद्रकांत पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला या अपघाताची माहिती दिली. नंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली. हे ऐकून मला मोठा धक्का बसला. त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मात्र तरुण वयापासून बुद्धीकौशल्य, संघटन कौशल्य वापरून त्यांनी मोठं काम केलं. त्यांनी मराठा समाजासाठी चळवळ उभी केली. त्यांच्या जाण्याने या चळवळीला मोठा धक्का बसला आहे. मेटे यांना मी मागील २२ ते २३ वर्षापासून बघत आले आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. मला त्यांच्याविषयी कौतूक वाटायचं,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

हेही वाचा >>> भारताचे दरवाजे आमच्यासाठी उघडा; अफगाणिस्तानातल्या विद्यार्थ्यांची साद

“ऐवढा हुशार नेता आज हरपला आहे, याचे मला वाईट वाटत आहे. माझे नवीन लग्न झाले होते. मेटे यांनी मराठवाड्यातील अनेक नेत्यांना एकत्र करून मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव देशमुख तर मुख्य अतिथी म्हणून गोपीनाथ मुंडे होते. या कार्यक्रमासाठी मलादेखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी मी राजकारणात नव्हते. आम्ही अनेक सभांमध्ये एकत्र असायचो. माझ्या संघर्ष यात्रेमध्ये ते माझ्यासोबत होते,” अशी आठवण पंकजा मुंडे यांनी सांगितली.

हेही वाचा >>> विनायक मेटेंच्या मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर आरोप

“नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईत सागर बंगल्यावर आमची भेट झाली होती. नंतर मला तुम्हाला भेटायचे आहे, असा त्यांचा निरोप आला होता. आम्ही १५ ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर भेटू असा निरोप मी त्यांना दिला होता. त्यांना काय बोलायचं होतं, आमच्यात काय चर्चा होणार होती, हे त्यांच्यासोबतच गेले आहे. मला खूप वाईट वाटत आहे,” अशा भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.