मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मद्यनिर्मिती कंपन्यांना पुरवले जाणारे पाणी बंद करण्याची मागणीला राज्याच्या महिला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध दर्शविला आहे. शेती आणि लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागल्यानंतरच उद्योगांना पाणी देण्यात येते. मद्यनिर्मिती किंवा अन्य उद्योगधंद्याना देण्यात येणारे पाणी हे आरक्षित केलेले असते. त्यामुळे अशा उद्योगांचे पाणी बंद करणे अयोग्य ठरेल, असे मत त्यांनी बीडमध्ये बोलताना व्यक्त केले. उद्योगांना आरक्षित पाण्याशिवाय अन्य कोट्यातून पाणी देत असल्यास ते बंद करावे. मात्र, उद्योगांच्या वाट्याचे आरक्षित पाणी बंद केल्यास त्यामुळे उद्योगांपेक्षा लोकांचे आणि शासनाचेच अधिक नुकसान होईल. या उद्योगांमुळे शासनाला महसूल आणि लोकांना रोजगार मिळतो. दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटे आहेत. जर या कंपन्या बंद पडल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणं चुकीचं ठरेल, असे पंकजा यांनी सांगितले. दुसरीकडे, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दारू कंपन्यांचे पाणी तात्काळ बंद करा, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.