भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नाबाबत भाष्य केलं आहे. पंकजा मुंडे या सध्या राजकारणात आहेत. मात्र, राजकारणात येण्याआधी त्यांना नेमकं कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं होतं? याबाबत त्यांनी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

पंकजा मुंडे यांना डॉक्टर व्हायचं होतं, मात्र मार्क कमी पडले आणि त्यांचं डॉक्टर व्होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. त्यांच्याबाबत बोलताना धनंजय मुंडे फार भाग्यवान असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी त्यांच्या स्वत:च्या व्यवसायाबाबतही भाष्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

“मला डॉक्टर व्हायचं होतं, डॉक्टर होण्याची मला खूप हौस होती. पण मी डॉक्टर झाले नाही. कारण माझा तत्ववादी स्वभाव होता आणि मला मार्क कमी मिळाले म्हणून मी अॅडमिशन घेतलं नाही. मग आमच्या प्रीतम ताईंना (प्रीतम मुंडे) वकील व्हायचं होतं, पण त्या डॉक्टर झाल्या आणि येसू ताई वकील झाल्या. म्हणजे ज्याला जे व्हायचं नसतं ते व्हावं लागतं. मात्र, धनुभाऊ तुम्ही फार भाग्यवान आहात, तुम्हाला राजकारणात यायचं होतं तुम्ही राजकारणात आलात”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाबाबत खंत व्यक्त केली.

‘मी मोठी डिस्टिलरी चालवते…’

या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी व्यवसायाबाबतही भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, “माझा जो व्यवसाय आहे, त्याचा आणि माझा काहीही दुरान्वये संबंध नाही. मी मोठी डिस्टिलरी चालवते. अल्कोहल बनवते. तिथला कारभार कसा चालतो, किंवा तेथील ब्रँड कोणता? हे सुद्धा मला माहिती नाही. पण तरी मी ते उद्योग चालवते”, असं म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकल्याचं पाहायला मिळालं.