भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेलं एक वक्तव्य जोरदार चर्चेत आलं आहे. पंकजा मुंडे यांनी केजमधील एका कार्यक्रमात रिटायर्डमेंटच्या चर्चांच्या संदर्भात जुन्या वक्तव्यावर आणि त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर स्पष्टीकरण दिलं आहे. कोणीतरी बातमी दिलेली ताई रिटायर्ड होणार, काही रिटायर्ड होत नाही, चांगली खमकी आहे, रिटायर काय व्हायचंय, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मी कुठेही जात नाही इथेच आहे. कुणीतरी बातमी दिली ताई रिटायर्ड होणार. काही रिटायर्ड वगैरे होत नसते मी चांगली खमकी आहे. मला कुठे काय झालंय? रिटायर्ड काय व्हायचं आहे? दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं आधी नाही व्हायचं. आता मला ४७ वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्यात दम खूप आहे असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर आता चर्चा अशी रंगली आहे की दोन-चार जणांना रिटायर्ड करायचं हा त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे?
गोपीनाथ मुंडे पाच वर्षे जगले असते तर..
आपल्याला लोकांची सेवा करण्यात कमी पडायला नाही पाहिजे ही भावना असते, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले, खूप कष्ट काढले. देवाने सुखाने खाऊ दिलं नाही, ते पाच वर्ष जगले असते तर तुमच्यासाठीच जगले असते हा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आम्ही पण तुमच्यासाठीच जगतोय, तुमच्यासाठीच काम करतोय ही भावना आहे, असं त्यांनी म्हटलं.
आम्हीही केवळ तुमच्यासाठीच जगतो-पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “आम्हीही केवळ तुमच्यासाठीच जगतो आणि काम करतो. जरी आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरी कृपया मनाचे नाते तोडू नका. आपण सर्वांनी मिळून हे एक विशाल कुटुंब उभारले आहे. ते तोडण्यासाठी टपलेले अनेक लोक आहेत. कृपया तसे होऊ देऊ नका.” “आपल्या भविष्यासाठी, जिल्ह्याच्या भविष्यासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि बहुजन समाजासाठी हे कार्य पुढे नेण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. मी ही जबाबदारी तुमच्यावर सोपवते. आपला प्रेमाचा आशीर्वाद कायम असुद्या,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी कुणावर व्यक्त केला संताप?
बोगस रस्ते आणि सभागृहांची बिले उचलणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. माझ्या विभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावात नवीन उद्योजक घडवण्याचे माझे उद्दिष्ट आहे. यासाठी ५० टक्क्यांपर्यंतचे भरीव अनुदान उपलब्ध आहे. जर तरुणांनी एखाद्या व्यवसायात १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली, तर त्यांना सरकारकडून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळेल. पण इथे अशा भ्रष्टाचाराला अजिबात वाव नाही. सिग्नल तोडणे, चोरी करणे किंवा महामार्गावरील ढाब्यांवर जाऊन मद्यपान करून गाडी चालवणे, यांसारख्या गोष्टींचे समर्थन करण्यासाठी मला ही उमेदवारी मिळालेली नाही. केवळ नियमांचे पालन करणारा नेताच लोकांचे जीवन खऱ्या अर्थाने घडवू शकतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
