Pankaja Munde On Pritam Munde : राज्यसभेच्या जवळपास ३७ जागा रिक्त होत आहेत. यापैकी ७ जागा महाराष्ट्रातील आहेत. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांच्या अनुषंगाने आता घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपाचे आदी दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी भाजपाकडून राज्यसभेसाठी नावं निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपा नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राज्यसभेसाठी प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत असून बाकी निर्णय पक्षाचे नेते घेतील’, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“राज्यसभेसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. त्या नावांपैकी एक नाव प्रीतम मुंडे यांचं देखील आहे. कारण त्या देखील या आधी खासदार होत्या. पण यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मी (पंकजा मुंडे) लोकसभा लढवली होती. त्यानंतर प्रीतम मुंडे यांनी पक्षाचं काम केलं, तसेच त्यांनी खासदार म्हणून देखील काम केलेलं आहे. आता प्रीतम मुंडे यांच्या नावाबरोबरच आणखी काही नावं देखील चर्चेत आहेत. त्यामुळे आता बाकी निर्णय आमच्या पक्षाचे सर्व नेते घेतील अशी आमची अपेक्षा आहे”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
भाजपाच्या बैठकीत काय चर्चा झाली?
या बैठकीत विनोद तावडे, रामदास आठवले, रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर आणि भागवत कराड यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांच्या नावांवर चर्चा झाली. बैठकीत काही इतर नावांचाही विचार करण्यात आला. सूत्रांचे म्हणणे आहे की, पर्याय निवडताना पक्ष अनुभव, निष्ठा आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वाचा विचार करत आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी आपली मते मांडल्याचे समजते.
राज्य पातळीवर कोणताही अंतिम निर्णय झाला नसला तरी सुचविलेल्या नावांची एक यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी आता दिल्लीतील भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाईल. शिफारसींवर चर्चा करण्यासाठी रविंद्र चव्हाण लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेण्याची शक्यता आहे. अंतर्गत चर्चेनंतर केंद्रीय नेतृत्वच अंतिम निर्णय घेईल, असे सांगण्यात आले आहे.

