भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही वर्षांत मोठी चर्चा पाहायला मिळाली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना न देण्यात आलेल्या उमेदवारीवरून तेव्हा चर्चा झाली. त्यावेळी भाजपात असणारे एकनाथ खडसे, पंकजा मुंडे व विनोद तावडे त्यावरून नाराज असल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. तेव्हापासून पंकजा मुंडेंना भाजपानं बाजूला सारलं असून त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे दावे केले जात होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा सुरू झाली असून त्यावर पंकजा मुंडे यांनी स्वत: मोठं विधान केलं आहे. त्या बीडमध्ये एका जाहीर कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीबाबत फडणवीस म्हणतात… पंकजा मुंडे सध्या भाजपाच्या राष्ट्रीय मंत्री असून त्यांना फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात जेव्हा माध्यम प्रतिनिधींन देवेंद्र फडणवीसांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी यासंदर्भात चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं. "पंकजा मुंडे आणि माझी संघटनेच्या विषयानिमित्त नेहमीच भेट होत असते. पण आमच्या भेटीत राज्यसभेच्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. राज्यसभेत कोण जाणार? याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेत असतात. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे की आणखी कोणते पद द्यायचे हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल", असं ते म्हणाले. "आता लोकांना वाटतंय की मला मतदारसंघच राहिलेला नाही" दरम्यान, आपल्या उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. "गेल्या ५ वर्षांत अशी कोणती निवडणूक आली ज्यात माझं नाव नव्हतं? विधानसभा, राज्यसभा या कोणत्याही निवडणुकीत माझं नाव चर्चेत येतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी एका पदाच्या प्रतीक्षेत आहे असं लोकांना वाटतं. त्या हिशेबाने लोक माझं नाव घेतात. आता या तीन पक्षांच्या सरकारमुळे अशी चर्चा आहे की मला मतदारसंघच राहिलेला नाही. त्यामुळे साहजिकच या चर्चा येतात. त्यावर मी काहीही करू शकत नाही", असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. “मला दगाफटका, राजकीय वनवास झाला”, पंकजा मुंडेंचं विधान चर्चेत; राज्यसभा उमेदवारीबाबत म्हणाल्या… पंकजा मुंडेंना नेमकी कोणती जबाबदारी हवीये? दरम्यान, सध्याच्या उमेदवारीच्या चर्चेबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता पंकजा मुंडेंनी त्यावर सूचक विधान केलं आहे. "मला कुठे जायला आवडेल ही निवड मी द्यायला आता उशीर झालेला आहे. आता माझ्याकडे मोठ्या उमेदीनं पाहणाऱ्या लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे. त्यांना मला जिथे पाहायला आवडेल तिथे मी दिसले, तर फार मोठी गोष्ट आहे", असं त्या म्हणाल्या. "मी दु:ख दाखवत नाही" दरम्यान, आपण कधीच चेहऱ्यावर दु:ख दाखवत नाही, असंही विधान पंकजा मुंडेंनी यावेळी केलं आहे. त्यांच्या खांद्याच्या दुखापतीविषयी विचारणा केली असता त्या म्हणाल्या, "मला डाव्या खांद्याला कॅप्सुलायटस झालं आहे. त्यामुळे मला हात उचलता येत नाही. पण माझा स्वभाव आहे की जनतेत आल्यानंतर मी कधीच दु:ख चेहऱ्यावर दिसू देत नाही. मग ते मनाला झालेलं दु:ख असेल किंवा शरीराला झालेलं असेल", असं त्या म्हणाल्या.