Pankaja Munde Ramp Walk controversy : पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे सध्या एका फॅशन शोमधील रॅम्प वॉकमुळे चर्चेत आल्या आहेत. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना पंकजा मुंडे फॅशन शोमध्ये सहभागी झाल्याचा आरोप करत विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना, “मी अशा रॅम्प वॉकमध्ये पुन्हा सहभागी होईन”, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले.
मॉडेल म्हणून गेले नव्हते
रॅम्प वॉकबाबत स्पष्टीकरण देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “मी जालन्याची पालकमंत्री आहे आणि जालना हा एक अग्रगण्य जिल्हा आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘जालनाई’ या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले होते. जालन्यातील महिलांना रोजगार मिळावा आणि त्यांना आर्थिक ताकद मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. तिथे अतिशय सुंदर वस्त्रे बनवून ती बाहेर विकली जातात. एका मोठ्या फॅशन शो कार्यक्रमात मला निमंत्रित करण्यात आले होते, ही कौतुकास्पद बाब आहे. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील सीईओंनी सादरीकरण केले; आम्ही तिथे मॉडेल म्हणून गेलो नव्हतो.”
…तर पुन्हा रॅम्प वॉक करेन
त्या पुढे म्हणाल्या, “पर्यावरणमंत्री म्हणून मला तिथे आमंत्रित करण्यात आले होते, जेणेकरून कापड (फॅब्रिक) पर्यावरणपूरक कसे आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावे. जालना जिल्ह्यातील तुती उत्पादक शेतकरी व हातमाग कारागिरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा साड्यांचा स्टॉल लावण्यात आला होता. अनेकजण ते कपडे उत्सुकतेने पाहत व विकत घेत होते, याचा मला अभिमान वाटतो. महिलांना रोजगार मिळावा आणि ‘सस्टेनेबल फॅशन’बद्दल जनजागृती व्हावी, यासाठीच आम्ही रॅम्प वॉक केला. या महिलांची साडी दिल्ली, मुंबई किंवा इतर कोणत्याही शहरात विकली जाणार असेल, तर मी तिथेही रॅम्प वॉक करायला तयार आहे.”
मला फॅशनची हौस नाही
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी २४ वर्षांच्या मुलाची आई आहे, २२ वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहे आणि ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करते. एका मोठ्या कार्यक्रमात जालन्यातील महिलांचा स्टॉल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अनेक सेलिब्रिटी तिथे येऊन जालन्यातील साडी विकत घेत होते, म्हणूनच मी रॅम्प वॉक केला. मला फॅशनची कोणतीही हौस नाही. पण या महिलांच्या भल्यासाठी मला पुन्हा रॅम्प वॉक करावा लागला, तर मी तो नक्कीच करेन. कारण माझ्या जालन्यातील महिलांची साडी मुंबईतील महिलांनी खरेदी केली, तर तो पैसा थेट जालन्यातील महिलांच्या खिशात जाईल.”
