भारतीय जनता पक्षाच्या नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या मोठी चर्चा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट ‘राजकारणातून रिटायर्ड व्हावं वाटतंय’, असं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याच कार्यक्रमाच्या भाषणात पुढे बोलताना आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाची कामं करण्यासाठी जोमाने काम करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
मंत्री पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“आधी दोन पदरी रस्ता होता, आता चार पदरी, सहा पदरी रस्ता सुरू आहे. त्यासाठी एवढं खोदून ठेवलंय की या रस्त्यावरून मी खडकत-खडकत इथपर्यंत आले. येताना माझ्या पीएला म्हटलं की, आता मला कंटाळा आलाय. वयाच्या २४ वर्षांपासून मी काम करत आहे. आता मी ४८ वर्षांची झाले आहे, त्यामुळे गेली तब्बल २४ वर्षे याच रस्त्याने, हीच माणसं आणि तेच सगंळ, हे सगळं कसं बदलायचं? मला आता कंटाळा आलाय, रिटायर्ड व्हावं वाटतंय असं मी म्हटलं”, असं पंकजा मुंडे यांनी भाषणात बोलताना सांगितलं.
‘लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नव्हे, तर जनतेसाठी’
“मी जेव्हा या कार्यक्रमात आले आणि तुमच्या सर्वांचा उत्साह पाहिला, गरीब घरातील या चमकणाऱ्या डोळ्यांकडे बघितलं तेव्हा वाटलं की आपलं काम अजून संपलेलं नाही. जनतेचा उत्साह पाहून नव्याने उभारी मिळते. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमचा विकास करण्यासाठी आहे. ही गाडी, हे पद, ही ताकद, हा लाल दिवा हा प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवण्यासाठीच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाच्या कामांसाठी अधिक जोमाने काम करणार आहे”, असं आश्वासनही पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिलं.
धनंजय मुंडेंच्याही वक्तव्याची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. परळीमधील एका कार्यक्रमात बोलताना धनंजय मुंडे यांनी केलेल्या भाषणात काही सूचक भाष्य केलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात ‘कमबॅक’ करणार का? अशा चर्चांनी जोर धरला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, “मी स्वतः जीम करत आहे. बऱ्यापैकी मी माझं वजन कमी केलं आहे, तसंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. मात्र, येणारा काळ आपला आहे आणि त्या काळात आपण चांगलं फिट राहायला पाहिजे. त्यासाठी मी आता जीम करत आहे. कारण गेल्या एक ते दीड वर्षांत जीवातले जिवलग सहकारी मित्र देखील मला भेटल्यावर एकच प्रश्न विचारायचे. भाऊ तब्येत कशी आहे? मी ते ऐकून-ऐकून परेशान झालो होतो. मग मी म्हटलं की आता आपला चमत्कार दाखवावा लागेल”, असं सूचक भाष्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे.
