भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पण सध्या पंकजा मुंडे विविध ठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. अलीकडेच नाशिकमधील सभेत 'मी कुणासमोरही झुकणार नाही' असं विधान केलं होतं. त्यानंतर बीड येथील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी “प्रत्येकवेळी आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं… असं म्हटलं तर आपल्या बाब्याला कार्टं व्हायला फार वेळ लागणार नाही, असं सूचक विधान केलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचं एक विधान समोर आलं आहे. "बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. आता बोलायची वेळ आली आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या परळी तालुक्यातील शेलु येथे जलजीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या. हेही वाचा- "न्यायालयाने काहीही निकाल दिला, तरी…", शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधवांचं सूचक विधान! खरं तर, परळी विधानसभा मतदारसंघात मुंडे बंधू-भगिनीमध्ये विकास कामाच्या निधीवरून चांगला संघर्ष सुरू आहे. मी मागच्या पाच वर्षांमध्ये नुसती कामं दिली. नारळ कोणी फोडले? हे माहीत नाही. मात्र आता नारळ फोडून हात दुखत आहेत. मी कधीही श्रेय घेण्यासाठी आले नाही. पण आता बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि नाही बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी श्रेय वादावरून अप्रत्यक्ष धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. हेही वाचा- “आमचा विश्वासघात झाला”; मध्यवर्ती समितीने संप मागे घेताच शासकीय कर्मचारी आक्रमक परळी येथील कार्यक्रमात भाषण करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, "आता नारळ फोडताना काही लोकांनी माझ्या हातात नारळ दिला आणि नारळ फोडायला सांगितलं. पण मला हे अवघड जातंय. आता मी नारळ फोडायला सुरुवात केली आहे. मागच्या पाच वर्षात मी नुसती कामं दिली. नारळ कुणी फोडले? माहीत नाही. पण आता नारळ फोडून-फोडून माझा तर हातच दुखायला लागला आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं, आता माझ्याकडून नारळ फोडणं शक्य नाही, तुम्हीच नारळ फोडा. मी काही इथल्या कामाचं श्रेय घ्यायला आले नाही. पण आता काय करणार? कारण आता जग वेगळं आहे. आता बोलणाऱ्यांचे अंबाडे विकतात आणि न बोलणाऱ्यांचे गहूही विकत नाहीत. त्यामुळे आता बोलायची वेळ आली आहे. आपण आपलं वाजवून सांगितलं नाही, तर लोकांच्या लक्षात येणार नाही."