बीड जिल्ह्यामध्ये मोठा प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. माफियाराज सुरू झाला आहे, सामान्य लोकांचे हित धाब्यावर बसून स्वतःचे खिसे भरण्याच काम सुरु आहे. असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील केज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. तसेच, “आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं.” असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

याचबरोबर, “सत्ता ही कुणाच्या ताब्यात द्यायची आणि कुणाच्या ताब्यात द्यायची नाही, हे जनतेला आता कळलेलं आहे. म्हणून आताचे हे निकाल आहेत. आता जे निकाल लागले हा पंकजा मुंडे, प्रितम मुंडे यांचा विजय नाही हा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा आहे. तर, सत्ताधाऱ्यांचा पराभव आहे. हा जनतेने दिलेला कल आहे. आम्ही आगामी काळातील निवडणुका देखील जिंकणार आहोत, ही विजयाची मुहूर्तमेढ आहे. आगामी विधानसभेत परत पहिल्यासारखा निकाल लागणार आहे, लोकसभेत परत पहिल्यासारखा निकाल लागणार आहे कारण जनता आमच्या पाठीशी आहे. केजमध्ये नगराध्यक्ष आमचाच होणार.” असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, “काम करत असताना कधी भेदभाव करायचा नाही, किती योजना आणल्या? आपल्या जिल्ह्याला आपला पालकमंत्री काय देतो हा हिशोब करायची बीड जिल्ह्याला सवय नाही. आमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री राज्याला काय देतो? देशाला काय देतो? हा अभ्यास करायची बीड जिल्ह्याला सवय आहे. तुम्ही कधी पदर पसरून काही मागून आणण्याची गरज बीड जिल्ह्याला भासलीच नाही.” असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

याशिवाय, “आम्ही जर भाषण करताना म्हटलं की बीड जिल्ह्याला पहिल्या चारमधील मंत्रीपदाची सवय आहे, तुमचा नंबर ३२ वा आहे. आता जे आहे ते आम्ही बोललो, आम्ही काय खिजवलं नाही. मी ३२ वा नंबर म्हणाले मी औकात काढली का? तुम्ही माझा तो व्हिडिओ परत एकदा पाहू शकता. मी तुमची ताकद आहे का? असं म्हणाले, औकात नाही काढली. ते म्हणतात तुम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. मी ३२ नंबरचं मंत्रीपद म्हटलं तर यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान काय आहे? बाबासाहेबांचा अपमान तुम्ही आणि तुमचे कार्यकर्ते करतात. खोटे अट्रासिटीचे गुन्हे दाखल करतात, कायदा वापरतात, पोलिसांना घरी कामाला ठेवल्यासारखं वापरून घेता. तुम्ही बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान करत आहात. बाबासाहेबांनी अट्रासिटीचे कवचकुंडलं गरिबांना वाचवण्यासाठी दिलेले आहेत. त्याचा गैरवापर बीड जिल्ह्यात जर कुणी केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही. आयत्या पीठावर रेघोट्या ओढण्याची यांना सवय झालेली आहे. परंतु आता लोकांसमोर सत्य आलेलं आहे.” असं यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलत धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde targeted minister dhananjay munde said msr
First published on: 25-01-2022 at 16:45 IST