परळी दगडफेक प्रकरणाची सविस्तर माहिती व चुकांचा अहवाल पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृह विभागाला पाठविला आहे. दरम्यान, अंत्यविधीत झालेल्या गदारोळास पोलीस अधिकारी व प्रशासन जबाबदार असल्याचा सूर भाजप कार्यकर्त्यांतून आळवला जात आहे. लाकडी कडे पुरसे नसल्याने अंत्यसंस्काराच्या वेळी रेटारेटी झाली. नेत्यांचे अंत्यदर्शनाची प्रत्येक व्यक्तीची इच्छा होती. तथापि ते कसे होणार, याच्या ना सूचना दिल्या जात होत्या, ना तशी तयारी केली होती. परिणामी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांवरील रोष वाढला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही तयारी खात्री करुन न घेतल्याने नियोजन बिघडल्याचे सांगितले जाते.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, सुषमा स्वराज यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना अंत्यदर्शनासाठी नेताना पोलिसांना अक्षरश: कसरत करावी लागली. दगडफेक नक्की कोणत्या बाजूने सुरू झाली. पोलिसांनी लाठीहल्ला का केला, याची चौकशी केली जाणार आहे. दगडफेकीचा प्रकार झाल्यानंतर लाठीहल्ला करुन दूपर्यंत जमावाला पांगविणे व नंतर गोळीबार करणे, अशी व्यूहरचना असते. मात्र, कोणत्याही स्थितीत गोळीबार होणार नाही, याची दक्षता घेतल्याचा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.
अंत्यविधीसाठी केलेला चौथरा पुरेसा उंच नसणे, अंत्यदर्शनासाठी रांग कशी लावायची, किती अंतरावरुन पार्थिव दिसेल, या बाबतच्या सूचना दिल्या जात नव्हत्या. परिणामी कार्यकर्त्यांची रेटारेटी वाढली. त्याला थांबविण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने पोलिसांनी अंग काढून घेतल्यासारखे वातावरण होते. असे का घडले, याची चौकशी करण्यासाठी नेमके काय आणि कसे घडले, याचा अहवाल गृह विभागाला पाठविण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू होती.
विशेष म्हणजे अंत्यदर्शनाची तयारी कशी असावी, याच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी या अधिकाऱ्यांसह ग्राहक व सार्वजनिक वितरण व्यवस्था विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे समन्वयाचे काम पाहत होते. मात्र, ऐन वेळी एकाच ठिकाणी पार्थिव ठेवण्याच्या मध्यरात्रीच्या निर्णयामुळे सुरक्षा व्यवस्थेवर ताण आला. परिणामी नियोजन कोलमडले. भाजप कार्यकर्त्यांकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नीट नियोजन न केल्याचा आरोप केला जात आहे. तर पोलीस विभागाने घडलेल्या घटनेचा अहवाल गृह मंत्रालयास पाठविला आहे.