राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लीम समाजाला जाहीर केलेले शिक्षण, तसेच नोकरीतील ५ टक्के आरक्षण युती सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३ दिवस सभागृहाचे कामकाज बंद पाडले. भविष्यात सरकारला मुस्लिमांना आरक्षण देण्यास भाग पाडू. या साठी राज्यभर आंदोलन करत सरकारशी संघर्ष करू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला.
परळीतील इटके कॉर्नर येथे शनिवारी सकाळी मुस्लीम समाजातर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात विरोधी पक्षनेते मुंडे सामील झाले. या वेळी बोलताना मुंडे यांनी आघाडी सरकारने मराठा समाजासह मुस्लीम समाजालाही शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, कायद्याच्या कचाटय़ातून हे आरक्षण वाचवण्यासाठी भाजप युती सरकारने प्रयत्न केलेच नाहीत. उलट हे आरक्षण रद्द करण्याची भूमिका घेतली. सरकारच्या निर्णयाविरोधात विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३ दिवस कामकाज बंद पाडण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. मुस्लीम समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी अधिवेशनावर मोर्चाही काढावा, असे आवाहन करून मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला भाग पाडू. या साठी सरकारशी तीव्र संघर्ष करण्याचा इशारा मुंडे यांनी दिला. या वेळी मुक्ती सय्यद अशफाक, शेख असीफ, अखिल कुरेशी, मिस्कीन आय्युब खान पठाण, अ‍ॅड. मंजूर अली, जफर जहागीरदार अजमत खान, नगराध्यक्ष ??बाजीराव धर्माधिकारी, माणिक फड आदी उपस्थित होते.