बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ मंदिर समितीस प्राप्त झालेल्या पत्रामुळे सध्या खळबळ माजली आहे. “वैद्यनाथ मंदिर संस्थानाकडे खूप पैसे आले आहेत. ५० लाख रुपये द्या अन्यथा RDXने मंदिर उडवून देवू”, अशा आशयाचं हे पत्र आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख यांना हे पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पत्रात लिहिलं आहे की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानाचे विश्वस्त आहात. आत्तापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ रक्कम देणगी रुपाने मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तुलधारक आहे. मला ५० लाख रुपयांची तातडीने गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडच्या RDX ने उडवेन. या पत्रामुळे सध्या एकच खळबळ माजली असून संस्थानाच्या तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पत्राच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरातली सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे.

परळी वैद्यनाथ हे देवस्थान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते. या मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. कोविड प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंद असलेलं हे मंदिर आता निर्बंध शिथिल झाल्याने खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख मंदिरात येऊन टपालाद्वारे आलेली पत्रे पाहत असताना त्यांना हे पत्र आढळले.

हे पत्र व्यंकट गुरुपद मठपती या नावाने आले होते. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णुपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी २४ तासात तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना नांदेडहून ताब्यात घेतले आहे. या दोघांकडूनही सध्या अधिक चौकशी सुरू आहे. तर बीड पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली असून श्वान पथकही बोलवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parali vaijanath temple in beed rdx blast on temple vsk
First published on: 27-11-2021 at 14:05 IST