scorecardresearch

सोलापूरची समांतर जलवाहिनी १७० एमएलडी क्षमतेची होणार

सोलापूर शहराचा वाढता विस्तार विचारात घेता शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलाशय-सोलापूर थेट जलवाहिनी योजनेला पर्याय म्हणून पुढे आलेली समांतर जलवाहिनी योजना रखडली आहे.

पंतप्रधानांनी भूमिपूजन केलेली योजना रखडली

सोलापूर : सोलापूर शहराचा वाढता विस्तार विचारात घेता शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी जलाशय-सोलापूर थेट जलवाहिनी योजनेला पर्याय म्हणून पुढे आलेली समांतर जलवाहिनी योजना रखडली आहे. यातच आता ही समांतर जलवाहिनी योजना ११० एमएलडी क्षमतेवरून १७० एमएलडी क्षमतेपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव तयार होत आहे. त्याचा वाढीव आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तयार केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यापूर्वी भूमिपूजन झालेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचा सुमारे ४५० कोटी रुपये खर्चाचा मक्ता हैदराबादच्या पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला होता. परंतु मक्तेदार कंपनीने या ना त्या कारणांमुळे समांतर जलवाहिनी योजनेच्या कामाला विलंब लावला होता. त्यामुळे अलीकडेच हा मक्ता रद्द झाला आहे. या योजनेसाठी नव्याने प्रक्रिया राबविणे सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊनसुध्दा समांतर जलवाहिनी योजना रखडल्याचे कारण प्रामुख्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजप असल्याचे बोलले जाते. शिवाय आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आली असूनही समांतर जलवाहिनी योजनेला मुहूर्त लागत नाही. त्याबद्दल सत्ताधारी भाजपच्या वर्तुळातही मौन पाळले जात असल्याने त्याबद्दल प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने शहराच्या पाणीपुरवठा प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदामंत्री, वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका पदाधिकारी व प्रशासनाची बैठक झाली. या बैठकीत शहराच्या वाढत्या विस्तारासह लोकसंख्येचा विचार करून समांतर जलवाहिनी योजना ११० एमएलडी क्षमतेवरून वाढवून १७० एमएलडी क्षमतेची करण्यावर एकमत झाले. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून वाढीव पाणीपुरवठा विकास आराखडा तयार केला जात आहे. येत्या आडवडाभरात हा नवीन आराखडा तयार होऊन तो शासन आणि सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. समांतर जलवाहिनीची ही नवी योजना उभारण्यासाठी जवळपास दुप्पट खर्च येणार आहे. यापूर्वी तयार केलेल्या ११० एमएलडी पाणीपुरवठा क्षमतेच्या योजनेवर ४५० कोटींचा खर्च होणार होता. परंतु त्यात वाढ करून १७० एमएलडी क्षमतेच्या पाणीपुरवठा होण्यासाठी नव्याने समांतर जलवाहिनी योजना उभारल्यास त्यावर सुमारे आठशे कोटींचा अपेक्षित आहे. म्हणजे यात चारशे कोटींची खर्चवाढ होणार आहे. या वाढीव खर्चाचा डोंगर कोण उचलणार, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.

टाकळी जलवाहिनी योजनेला पर्याय म्हणून हिप्परगा जलाशयातून एकरूख सिंचन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होण्यासाठी २२० कोटी खर्चाचा वाढीव विकास आराखडाही तयार केला जाणार आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व एनटीपीसी प्रकल्पाच्या मदतीने उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना मंजूर झाली होती. सध्या अस्तित्वात असलेली उजनी-सोलापूर जलवाहिनी योजना सुमारे २८ वर्षांची जुनी आहे. त्यातून दररोज शहराला ६५ एमएलडी पाणी उपलब्ध होते. याशिवाय टाकळी येथून जलवाहिनीतून ६० एमएलडी पाणी उचलले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parallel waterway solapur capacity mld ysh

ताज्या बातम्या