Parambir Singh On Anil Deshmukh Allegation ; मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता. त्यानंतर गाडी मालकाची हत्या झाली होती. या दोन्ही प्रकरणांमध्ये तत्कालिन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह हेच सुत्रधार होते, असा आरोप आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, या आरोपांवर आता स्वत: परमबीर सिंह यांनी भाष्य केलं आहे. टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना, त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. नेमकं काय म्हणाले परमबीर सिंह? “या प्रकरणावर मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरित्या बोललो नाही. मला जे सांगायचं होतं ते मी न्यायालयात सांगितलं आहे. मात्र, अनिल देशमुख यांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे मला बोलणं भाग आहे. मुळात अनिल देशमुख ज्याप्रकारे बोलत आहेत, त्यावरून असं लक्षात येते की त्यांचे मानसिक संतूलन बिघडलं आहे”, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह यांनी दिलं. हेही वाचा - Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं गाण्याच्या एका ओळीत अनिल देशमुखांच्या आरोपांवर उत्तर, म्हणाले… “अनिल देशमुख वसुली करत होते” “मी जे आरोप केले होते. ते पुराव्यानिशी केले होते. ईडीच्या तपासात हे आरोप सिद्धही झाले. अनिल देशमुख हे वसुली करत होते. मुंबईतूनच नाही, तर राज्यातील विविध ठिकाणांहून ते वसूली करत होते. याचे सर्व पुरावे समोर आले आहेत. ज्यावेळी मी आरोप केले, त्यावेळी मला संजय पांडे यांच्याद्वारे धमकी देण्यात आली होती. त्याचे पुरावे, मी सीबीआयला दिले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयातही हे पुरावे सादर करण्यात आले होते”, असेही ते म्हणाले. अनिल देशमुखांच्या मुलाने भेट घेतल्याचा दावा पुढे बोलताना त्यांनी अनिल देशमुख यांच्या मुलाने त्यांची भेट घेतल्याचा दावाही त्यांनी केला. “ही घटना घडल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांचे सुपूत्र सलील देशमुख हे वरळीतल्या एका हॉटेलमध्ये मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी मला आरोप मागे घेण्यास सांगितले होते. तसेच मी आरोप मागे घेतले तर मला पोलीस महासंचालकपदी बढती दिली जाईल, असा प्रस्तावही त्यांनी दिला होता”, असे परमबीर सिंह यांनी सांगितलं. “मी नार्को टेस्ट करायला तयार” “मी जे सांगतो आहे, ते सर्व सत्य आहे. त्यासाठी माझी नार्को टेस्ट करण्याचीदेखील तयारी आहे. मी ज्यावेळी आरोप केले तेव्हा सचिन वाझे आणि इतर काही अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर वसूलीसाठी दबाव असल्याचे सांगितले होते. त्यानंतर याची कल्पना मी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील आणि शरद पवार यांना दिली होती. मात्र, त्यांनी यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे मला पत्रलिहून हे आरोप करावे लागले”, असेही त्यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा - Anil Deshmukh : “देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यात डील झाली आणि…”, अनिल देशमुखांचा आरोप “अनिल देशमुखांच्या आदेशावरून सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात” दरम्यान, “मनसूख हिरेन प्रकरणात अनिल देशमुख माझ्यावर जे आरोप करत आहेत, त्याच कोणतेही तथ्य नाही. जर हिरेन प्रकरणात मी सूत्रधार आहे, हे त्यांना माहिती होतं, तर त्यांनी गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही, याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं”, असे ते म्हणाले. याशिवाय “अनिल देशमुख यांच्या आदेशावरून सचिन वाझे यांचा पुन्हा पोलीस दलात समावेश करण्यात आला होता”, असेही त्यांनी सांगितले.