परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक ; खचलेल्या रस्त्याची डागडुजी अद्याप नाही

परशुराम घाटातील जमीन हीदेखील मालकी हक्काचा तिढा न सुटलेल्या जागांपैकी एक आहे.

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील खचलेल्या रस्त्याची अद्याप डागडुजीही करण्यात आली नसल्याने हा टापू वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या जागा संपादित करण्यात आल्या त्यापैकी काही जागांच्या मालकी हक्काचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परशुराम घाटातील जमीन हीदेखील मालकी हक्काचा तिढा न सुटलेल्या जागांपैकी एक आहे. त्यामुळे या घाटातील चौपदरीकरणाचे काम ठेकेदार कंपनीने अद्याप सुरू केलेले नाही. नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे आधीच धोकादायक असलेल्या घाटातील रस्त्याचा काही भाग जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खचला होता. त्या वेळी येथील पाण्याच्या लोंढय़ामुळे दरड कोसळून तिघेजण प्राणाला मुकले. घाट वाहतुकीला बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणच्या गटारात भराव टाकून खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली होती. पावसाळा संपताच रस्ता खचलेल्या ठिकाणी डागडुजी करणे गरजेचे होते. महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना देऊन हे काम युद्धपातळीवर करून घ्यायला हवे होते. मात्र ठेकेदाराने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही.

या घाटात वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या घाटाच्या चौपदरीकरणाबाबत असलेले वाद मिटवून चौपदरीकरणाचे काम वेळेत सुरू केले नाही तर या घाटात भीषण दुर्घटना घडण्याची भीती शक्यता नाकारता येत नाही. सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच धोकादायक ठरलेल्या परशुराम घाटातील धोका कायम आहे. या ठिकाणी पुन्हा रस्ता खचू लागला असून हा घाट पार करताना प्रवासी आणि चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. खेड तालुक्याच्या हद्दीतील महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. कशेडी ते परशुराम घाट या दरम्यानच्या ४४ किलोमीटर महामार्गापैकी सुमारे ३८ किलोमीटर कामाचे काँक्रीटीकरण झालेले आहे. मात्र परशुराम घाटात महामार्गाची संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याबाबत परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. संबंधित ठेकेदाराला काम सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही ठेकेदार कंपनी काम सुरू करण्यास तयार नसल्याने परशुराम घाटाचे चौपदरीकरण होणार की नाही, झाले तर ते कधी होणार याबाबत ठोसपणे काहीच सांगता येत नाही. परशुराम घाटाचे रखडलेले काम सुरूकरण्यासाठी जमीन मालक, खोत व कुळांनी एकत्र बसून आपापसात तोडगा काढावा अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. जमिनीच्या मोबदल्याबाबत कूळ ८० टक्के आणि खोत व देवस्थान प्रत्येकी १० टक्के, अशा पद्धतीने प्रशासनाकडून प्रस्तावही ठेवण्यात आला होता. पण दोन्ही प्रस्तावांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा तीव्र विरोध केला असल्याने घाटाचे चौपदरीकरण रखडले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Parashuram ghat dangerous for transportation zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या