परभणी: महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाच महिन्यांच्या रखडलेल्या वेतनासाठी सुरू केलेल्या काम बंद आंदोलनाला आणखी तीव्र करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांनीच घंटागाडीतील कचरा महापालिकेच्या समोर आणून टाकला. रस्ता अडवून कचरा आणून टाकल्याबद्दल आंदोलन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान महापालिका कामगार कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला आता जवळपास एक महिना पूर्ण होत आहे. अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही.

गेल्या महिनाभरापासून महापालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी महापालिका मुख्यालय परिसरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक विविध मार्गांचा अवलंब करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. ९) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास महापालिका मुख्यालयापुढील राष्ट्रीय महामार्गावर घंटागाडीतील कचरा उलथवून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात असलेले कर्मचारी संघटनेचे के. के. भारसाखळे, विनायक ठाकूर, नासेर खान, व्हीएस उपाडे, गौतम जोंधळे, राहुल पंडित आणि इतर दहा-बारा आंदोलकांवर नवा मोंढा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

नवा मोंढा पोलिस ठाण्याचे पोलीस हवालदार मळजीराम मुजमुले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मनपा कर्मचाऱ्यांचे मागील महिनाभरापासून महापालिका परिसरात आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिका परिसरात कर्तव्यावर असताना वर उल्लेख केलेल्या कर्मचाऱ्यांसह दहा-बारा जण जोरजोरात घोषणा देऊन गोंधळ करीत होते. त्यानंतर दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास कुठलीही पूर्वसूचना न देता महापालिका कार्यालयाकडून महामार्गावर घंटागाडी क्रमांक एमएच २२ एएन ३२१२ या वाहनास चालकासह थांबून गाडीमधील सर्व कचरा रस्त्याच्या मधोमध टाकून रहदारीस अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

आंदोलनाची कुठलीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्यावरील वाहने थांबून जोरजोरात घोषणाबाजी केली. यावेळी सरायक पोलीस निरीक्षक खंदारे यांनी आंदोलकांना असे करणे बेकायदेशीर असल्याचे सांगूनही आंदोलकांनी त्याकडे लक्ष दिले नाही. यावरून सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार भागवत नागरगोजे हे करीत आहेत.