परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन व कापूस ही दोन्ही प्रमुख नगदी पिके हातातून जाण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी कोरड्या दुष्काळाची मागणी केली आहे. सेलू तालुक्यात एका शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली तर मानवत तालुक्यात एका शेतकऱ्याने सात एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवले. दरम्यान जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी विविध पक्ष संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन ही पिके पाण्याअभावी सुकून, करपून जात आहेत. बागायती क्षेत्रावरील ऊस, हळद यासह भाजीपाला वर्गीय पिकांनाही पाऊस नसल्याचा तडाखा बसला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाचा खंड असल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट आणखीच घडत झाले आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील सर्व जलसाठे अजूनही तळालाच आहेत.
सध्या शेतातील प्रमुख पिके सोयाबीन, कापूस हे फुलोरा व फळधारणेच्या टप्प्यावर आहेत. या काळात पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच निसर्गाने पाठ फिरवली आहे. यामुळेः सोयाबीनच्या फुलोऱ्यातील फुले गळून पडत आहेत आणि लागलेल्या शेंगा झाडावरच करपून जात आहेत. कापसाचे पाते व बोंडे वाळून गळत असून झाडे सुकून माना टाकत आहेत. इतर सर्व खरीप पिके पाण्याअभावी डोळ्यांदेखत वाळत असल्याने शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. भीषण परिस्थितीमुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर आगामी काळात तीव्र पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न संपूर्ण निर्माण झाला आहे.
मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी(दि. ७) तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये अनुदान द्यावे. पीक विमा तात्काळ मंजूर करावा, प्रत्येक १० किलोमीटरवर चारा छावण्या उभाराव्या, भूमिहीन शेतमजुरांन ५०,००० रुपये मदत व रोजगार द्यावा. शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा फी व शालेय फी माफ करावी, अशा मागण्या करण्यास आल्या आहेत.
परभणीसह मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. अन्यथा येत्या शनिवारपासून (दि. १२)गंगाखेड – परभणी राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदेलनाचा इशारा किसानसभेच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.सरासरीच्या ७५ टक्क्यांखाली पाऊस असलेले सर्व तालुके व महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, पीक विम्याची अग्रीम रक्कम द्यावी, रोजगार हमी कामे सुरू करावी, मोफत चारा छावण्या उभाराव्या, कृषिपंपांसाठी पूर्ण दाबाने वीजपुरवठा करावा या मागण्या करण्यात आल्या आहेत.
जिंतूर तालुक्यांत पावसाचा मागील दोन महिन्या-हून अधिक काळ खंड पडल्यामुळे पिके धोक्यात आल्याने पंचनामे न करता सरसकट आर्थिक मदत देणे तसेच मागील वर्षाचा व चालू वर्षाचा पीक विमा वितरित करण्यासाठी माजी आमदार विजय भांबळे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यात सध्या सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्या त्या तालुक्यात पक्ष, संघटनांच्या वतीने जोर धरू लागले आहे.
