परभणी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी बहुतांश पक्षांनी स्वबळाचे दावे केलेले असले तरी जिल्ह्यातल्या सर्व ठिकाणी एकाही राजकीय पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवलेली नाही हे चित्र समोर आले आहे. नैसर्गिक मित्रपक्षांशी फारकत घेत काही ठिकाणी नव्याच राजकीय मित्रांशी संगनमत करण्याचे प्रकार घडले आहेत. पण जिल्ह्यात स्वतःच्या सामर्थ्यावर सातही पालिकांमध्ये स्वतंत्रपणे लढण्याची राजकीय शक्ती एकही पक्षात नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.
जिल्ह्यात सात ठिकाणच्या नगराध्यक्षपदांसाठी जवळपास ५० उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ६०२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रमुख नेत्यांपैकी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदींच्या जाहीर सभा पार पडल्या आहेत. प्रचारात आता रंग भरले असून आरोप, प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. एकमेकांच्या आधाराने निवडणुका लढवताना कोणी नवे मित्र तयार केले तर कोणी जुन्या नैसर्गिक मित्रांना सोडचिठ्ठी दिली आहे.
जिंतूर, सेलू या दोन पालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीतल्या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. या मतदारसंघात पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून माजी आमदार विजय भांबळे हे त्यांचे राजकीय विरोधक त्यांना आव्हान देत आहेत. या मतदारसंघात कोणत्याही निवडणुकीत सातत्याने बोर्डीकर विरुद्ध भांबळे असा संघर्ष गेल्या दोन दशकांपासून सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाने मानवत पालिकेत शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटासोबत युती केली असून राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्या विरोधात हे दोन पक्ष एकत्र आले आहेत. पाथरी पालिकेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, शिवसेनेच्या शिंदे गटाचे सईद खान, आमदार राजेश विटेकर असा तिहेरी संघर्ष पाहायला मिळत आहे.
सोनपेठ शहरात राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपदासाठी चंद्रकांत राठोड हे रिंगणात आहेत तर या ठिकाणी शहर परिवर्तन आघाडीने आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. गंगाखेड पालिकेत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल विरोधात भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. बहुतेक ठिकाणी जिल्ह्यात महायुतीतील पक्ष परस्परांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत.
विरोधी पक्षांपैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तीनही पक्षांनी काही ठिकाणी उमेदवार दिले असले तरी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नवी उमेद संचारल्याचे दिसून येत आहे. या तीन पक्षांपैकी काँग्रेस पक्षाने पाच ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचा कल जास्तीत जास्त सत्ताधारी पक्षांकडेच असल्याने विरोधी पक्षांना उमेदवार शोधताना बरीच कसरत करावी लागली आहे. अर्थात जिल्ह्यात एकाही राजकीय पक्षाला सात ठिकाणी अध्यक्षपदाचे उमेदवार देता आले नाहीत. निवडणुकीपूर्वी स्वबळाच्या केलेल्या वल्गना हवेतच राहिल्या आहेत.
