परभणी: जिल्ह्याच्या जैवविविधतेत आणखी एका आकर्षक स्थलांतरित पक्ष्याची नोंद झाली आहे. मानवत तालुक्यातील थार परिसरात युरोपियन रोलर (European Roller – Coracias garrulus) या देखण्या पक्ष्याचे दर्शन झाले आहे. पक्षी निरीक्षक माणिक पुरी आणि अशोक राउत यांनी या पक्ष्याचे निरीक्षण करून त्याची नोंद घेतली.
निळ्या, हिरवट निळ्या आणि तपकिरी रंगांच्या आकर्षक छटांमुळे युरोपियन रोलर हा पक्षी विशेष लक्षवेधी ठरतो. युरोप, पश्चिम आशिया आणि मध्य आशियातील काही भाग हे या पक्ष्याचे प्रजनन क्षेत्र असून हिवाळ्यात तो आफ्रिका खंडातील उप-सहारा प्रदेशात स्थलांतर करतो. या स्थलांतरादरम्यान भारतीय उपखंडातूनही त्याचा प्रवास होतो.
प्रामुख्याने कीटकभक्षी असलेल्या या पक्ष्याच्या खाद्यामध्ये नाकतोडे, टोळ, भुंगे, सरडे आणि इतर लहान जीवांचा समावेश होतो. उंच फांद्या किंवा विजेच्या तारांवर बसून भक्ष्याची टेहळणी करणे आणि अचानक झेप घेऊन शिकार करणे ही त्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात झालेली ही नोंद स्थानिक पक्षीवैविध्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. मराठवाड्यातील माळराने, शेती परिसर आणि नैसर्गिक अधिवास हे विविध स्थानिक तसेच स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे ठरत असल्याचे अशा निरीक्षणांतून अधोरेखित होते.
पक्षी निरीक्षक माणिक पुरी यांच्या या निरीक्षणामुळे परभणी जिल्ह्यातील पक्षीवैविध्याच्या अभ्यासात आणखी एका महत्त्वपूर्ण नोंदीची भर पडली आहे. अशा पक्ष्यांचे अधिवास जतन करणे आणि पक्षीनिरीक्षणाच्या नोंदींचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण करणे ही काळाची गरज आहे.
नोंद पक्षीवैभवात भर घालणारी…
सारस वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात आढळून येणाऱ्या स्थलांतरीत व स्थानिक स्थलांतरीत अशा जवळपास 193 पक्ष्याच्या प्रजातीच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत. माणिक पुरी यांनी घेतलेली ही नोंद सुद्धा महत्वपूर्ण असून जिल्ह्याच्या पक्षी वैभवात भर घालणारी आहे.- विजय ढाकणे, पक्षीनिरीक्षक
