पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी-कर्मचारी तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचे पहिले प्रशिक्षण आज येथे पार पडले. प्रशिक्षणादरम्यान १४ क्षेत्रीय अधिकारी, १५ मतदान केंद्राध्यक्ष आणि २४ मतदान अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
आज शुक्रवारी (दि.९) येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तथा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध बारकाव्यांबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुणा संगेवार यांनी मतदान प्रक्रियेविषयी तांत्रिक मार्गदर्शन केले.
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्या, मतदान केंद्रावरील व्यवस्थापन, निवडणूकविषयक कागदपत्रांची हाताळणी, मतदान प्रक्रियेतील नियम व सूचनांचे पालन तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कामकाज करण्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण २६ क्षेत्रीय अधिकारी, १०० मतदान केंद्राध्यक्ष आणि ३०० मतदान अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून प्रशिक्षणादरम्यान अनुपस्थित राहिलेल्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या खुलाशांची छाननी करून नियमानुसार पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणास उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्यासह तहसीलदार परभणी संदीप राजापुरे, तहसीलदार पूर्णा माधवराव बोथीकर, तहसीलदार गंगाखेड उषाकिरण शृंगारे, तहसीलदार जिंतूर शितल कछवे, तहसीलदार सेलू शिवाजी मगर, तहसीलदार सोनपेठ सुनील कावरखे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
