परभणी: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात असलेल्या ३० वर्षीय युवकाने चिट्ठी लिहून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ९) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ‘आरक्षण मिळत नसल्याने मी फाशी घेत आहे सरकारने लवकर आरक्षणाचा प्रश्न सोडावा’ असा मजकूर असलेली चिठ्ठी या तरुणाच्या खिशात आढळली आहे.
गणेश आश्रोबा ठोंबरे असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी बामणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश ठोंबरे यांनी रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी मुंडे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, बामणी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन प्राथमिक पंचनामा केला.
मृताच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश ठोंबरे हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्यात होते. याच कारणातून त्यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी बामणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार ठाकूर करीत आहेत. गणेश ठोंबरे यांचे चुलत भाऊ तथा पंचायत समिती सदस्य भास्करराव ठोंबरे यांनी सांगितले की, मागील दोन-तीन दिवसांपासून गणेश हे ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचा काहीच उपयोग होत नाही,’ असे म्हणत होते असे सांगितले. गणेश यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शासनाने कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरी तसेच आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भास्करराव ठोंबरे यांनी केली. आज सोमवारी (दि.१०) सकाळी गणेश ठोंबरे यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर कुटुंबीयांना स्वाधीन करण्यात आला.
