परभणी: जिल्ह्यात २० हजार ७७४ कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. दरम्यान पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्ह्यात १७ सप्टेंबरपर्यंत मंडळस्तरावर विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

यावेळी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण उपस्थित होते. ७ सप्टेंबर २०२३ रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीस जिल्ह्यातील माहिती संकलित करून उपलब्ध करून देण्यासाठी १८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली. या विशेष कक्षात विविध विभागांचे १२ सदस्य कार्यरत असून समितीमार्फत अभिलेख शोधण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या समितीचा जिल्हा दौरा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला. त्यानंतर जिल्ह्यातील विविध विभागांमधील अभिलेख तपासणीचे काम करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

परभणी जिल्ह्यातील एकूण १३ विभागांमधील २५ लाख ३० हजार ९६ विविध प्रकारच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मोडी भाषेतील ३ हजार ७८८ नोंदी, तसेच इतर अभिलेखांमधील ६ नोंदी अशा एकूण ३ हजार ७९४ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदींचे संपूर्ण मराठी भाषेत भाषांतर करून घेण्यात आले आहे. जिल्ह्यात विविध विभागांमध्ये आढळून आलेल्या मोडी व उर्दू भाषेतील कुणबी नोंदी http://www.parbhani.nic.in या संकेतस्थळावर तालुकानिहाय व गावनिहाय प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परभणी तालुक्यात ८ लाख १४ हजार ८२० नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी २४ गावांमध्ये ५८४ कुणबी नोंदी आढळल्या.

गंगाखेड तालुक्यात १ लाख ६५ हजार ४४ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी ४ गावांमध्ये ७६ कुणबी नोंदी आढळल्या तर पालम तालुक्यात १ लाख १५ हजार ८०४ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी ११ गावांमध्ये २२० कुणबी नोंदी आढळल्या. पूर्णा तालुक्यात २ लाख ६५ हजार ९३२ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी १३ गावांमध्ये २३२ कुणबी नोंदी आढळल्या. सेलू तालुक्यात २ लाख ३८ हजार ७७१ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी २४ गावांमध्ये ५२४ कुणबी नोंदी आढळल्या. जिंतूर तालुक्यात ३ लाख ६० हजार ९२३ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी ३६ गावांमध्ये ६५९ कुणबी नोंदी आढळल्या. पाथरी तालुक्यात २ लाख २६१ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी २३ गावांमध्ये ७१४ कुणबी नोंदी आढळल्या. मानवत तालुक्यात २ लाख ७ हजार ४२४ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी १८ गावांमध्ये ६९२ कुणबी नोंदी आढळल्या. सोनपेठ तालुक्यात १ लाख ६१ हजार ११७ नोंदी तपासण्यात आल्या. त्या नोंदीपैकी ९ गावांमध्ये १२९ कुणबी नोंदी आढळल्या. अशा एकूण २५ लाख ३० हजार ९६ नोंदी तपासण्यात आल्या. १६२ गावांमध्ये ३ हजार ७९४ कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.

मराठा समाजासाठी विशेष आर्थिक मागास प्रवर्ग अंतर्गत १० टक्के आरक्षणाच्या अनुषंगाने २०२४ ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत परभणी उपविभागीय कार्यालयाकडून १२ हजार ३६६, गंगाखेड उपविभागीय कार्यालयाकडून ११ हजार ७७८, सेलू उपविभागीय कार्यालयाकडून ९ हजार ५७६ आणि पाथरी उपविभागीय कार्यालयामार्फत ८ हजार ७०० अशी एकूण ४२ हजार ४२० प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत.

जात वैधता पडताळणीतील ८३४ प्रकरणे निकाली

न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन झाल्यापासून कुणबी, मराठा – कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांपैकी आतापर्यंत १ हजार २७६ अर्ज जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ८३४ जात वैधता प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. पडताळणी समितीने ८ अर्ज निकाली काढले आहेत. तर इतर कारणांमुळे २५३ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. सध्या १८४ अर्ज प्रलंबित असून, या प्रकरणांमध्ये ९० दिवसांमध्ये वंशावळ सिद्ध न झाल्याने आवश्यक त्रुटी पूर्तता झाली नाही.