परभणी: पाथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या परभणी गुन्हा अन्वेशन विभागाच्या कर्मचाऱ्याच्या पाठीत आरोपीने खंजीरने वार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीला व त्याच्या काही सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. ही घटना काल सोमवारी (दि. १६) रात्री ८:४० वाजण्याच्या सुमारास घडली.
पाथरी पोलीस ठाणे येथे गुरनं २४/२०१७ कलम ३९५ भादंवि गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी दीपक बिरजू भोसले हा चारठाणा पोलीस ठाणे हद्दीतील गोंडगे पिपरी शिवारात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना मिळाली. यावरून गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप, उपनिरीक्षक परिहार, पोलिस हवालदार निलेश भुजबळ यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री ८ वाजून ४० वाजण्याच्या सुमारास गोंडगे पिपरी शिवारात सापळा रचला. यावेळी दीपक भोसले यांनी पोलिसांना पाहताच पळून जात होता. पोलिस हवालदार निलेश भुजबळ यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास पकडले असता आरोपी दीपक भोसले याने निलेश भुजबळ यांच्या पाठीत खंजीरने वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत पोलिस हवालदार निलेश भुजबळ यांना जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर जिंतूर येथील डॉक्टरांनी उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन निलेश भुजबळ यांच्या प्रकृती संदर्भात विचारपूस केली. दरम्यान, पोलिस हवासदार निलेश भुजबळ यांच्या फिर्यादीवरून दीपक बिरजू भोसले, वैशाख बिरजू भोसले, मेकअप गिरीश भोसले, ननी सखाराम पवार, एकनाथ अंबादास भोसले, राजू लक्ष्मण चव्हाण, दीपक उर्फ दिपल्या भोसले, रेखा वैशाख भोसले यांच्याविरूद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुरन ४९/ २०२६ कलम १०९, १२१, (२) १३२, १८९, १८९ (२) १९१ (२) १९१ (३) १९० (४) (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे हे करीत आहेत.
