परभणी: स्वतःच्या पत्नीचा ऊसतोडीच्या कोयत्याने डोक्यावर, तोंडावर सपासप वार करीत निर्घृण खून करणार्‍या केशव गोविंदराव मोरे या कमलापूर (ता.पूर्णा) येथील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.पी. त्रिभूवन यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

याबाबत अधिक माहिती अशी की कमलापूर येथील व्यंकटी गोविंदराव मोरे यांनी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ताडकळस पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली. केशव गोविंदराव मोरे याने त्याच्या हातातील ऊसतोडीच्या कोयत्याने पत्नी आशाबाई हिच्या तोंडावर व डोक्यावर सपासप वार करून निर्घृण खून केला. हा प्रकार केशव याच्या मुलीसह आपण पाहिला. त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील कोयता पाहून त्याच्याजवळ जाण्याची आमची हिंमत झाली नाही. केशव आमच्यावरच चाल करुन येत असल्याने आपण, बंधू शंकरसह मदतीसाठी गावात पळालो, त्यावेळी केशव हा हातात कोयता घेऊन जोरजोरात ओरडत होता, असे या फिर्यादीत नमूद करण्यात आले. मुलासह नातेवाईक धाऊन आल्यानंतर आपणास केशव आणि त्याची मयत पत्नी आशाबाई यांच्यात शेतीला पाणी देण्यासाठी न जाण्याच्या कारणावरुन कडाक्याचे भांडण झाल्याचे कारण समोर आले होते.

या प्रकरणात ताडकळस पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तेव्हा घरासमोरील अंगणात आशाबाई हीचे धड मानेपासून वेगळ्या अवस्थेत दिसून आले. डोक्यावर आणि चेहर्‍यावर कोयत्याने अनेक वार केल्याने चेहरा ओळखू येत नव्हता. अंगणात व घरात सर्वत्र रक्त पडले होते. ताडकळस पोलिसांनी तात्काळ पंचनामे करीत आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय रामोड यांनी या प्रकरणात सर्व पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश त्रिभूवन यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षाकडून एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, फिर्यादी, मयताची मुलगी, वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली.

या प्रकरणात संबंधित आरोपीने तो मनोरुग्ण असल्याचा बचावात्मक पवित्रा घेतला. परंतु, तो मनोरुग्ण नसल्याबाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आरोपीचा मुलगा-मुलगी व वैद्यकीय अधिकार्‍यांनी साक्षीतून सिध्द केले. न्यायालयाने या प्रकरणात आरोपी केशव मोरे यास आजन्म कारावास, दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.