कराड : ​एरवी कायदा- सुव्यवस्था, प्रशासकीय बैठका, फायलींचा निपटारा आणि खुर्चीचा शिष्टाचार यांत व्यस्त असणाऱ्या प्रशासनाचा एक वेगळाच आणि मातीशी नाते सांगणारा संवेदनशील चेहरा पाटण तालुक्याने अनुभवला. बोंद्री (ता. पाटण) येथील शेतशिवारात गुडघाभर चिखलात उतरून थेट भातलावणी आणि चिखलणीचा आनंद घेणारे प्रांताधिकारी सोपान टोम्पे व तहसीलदार अनंत गुरव यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

​पावसाचा जोर वाढताच पाटण तालुक्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी कुटुंबं शिवारात राबताना दिसत आहेत. याच राबणाऱ्या हातांची कष्टप्रद जीवनशैली जवळून अनुभवावी, या उद्देशाने दोन्ही अधिकाऱ्यांनी बोंद्री गाव गाठले. केवळ औपचारिक भेट न देता, शिष्टाचार बाजूला ठेवत पॅन्ट दुमडून त्यांनी चिखलात पाऊल ठेवले. हातात भाताची रोपे घेऊन ती लावत बैलजोडीच्या मागे चिखलणी करण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला.

​यावेळी चिखलात उभे राहूनच अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. पावसाची स्थिती, मजुरांची उपलब्धता आणि शेतीतील अडचणी यांवर चर्चा केली. अधिकारी आपल्यासोबत काम करत असल्याचे पाहून ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला.​या उपक्रमात पत्रकार विक्रांत कांबळे, शंकरराव मोहिते, जालिंदर सत्रे, नितीन खैरमोडे व विद्या नारकर यांनीही सहभाग नोंदवला. काम आटोपल्यानंतर शेताच्या बांधावरच नाचणीची भाकरी, पिठलं आणि ठेचा या अस्सल ग्रामीण जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. प्रशासकीय खुर्चीच्या पलीकडे जाऊन अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या आपुलकीचे परिसरात कौतुक होत आहे.

​शेतकऱ्यांशी थेट सुसंवाद

चिखलात उभे राहूनच अधिकाऱ्यांनी पावसाची सद्यस्थिती, मजुरांची टंचाई आणि शेतीतील व्यावहारिक समस्या जाणून घेतल्या. ​शिष्टाचार बाजूला ठेवून श्रमदान: प्रांताधिकारी व तहसीलदारांनी स्वतः चिखलणी करत बैलजोडीच्या मागे चालण्याचा आणि भातरोपे लावण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

बांधावर अस्सल मेजवानी

कामाच्या काहिल्यानंतर अधिकारी, पत्रकार व शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर बसून नाचणीची भाकरी, पिठलं आणि ठेचा असा गावरान बेत अनुभवला. बेत लई भारी ठरला अशी प्रतिक्रिया या मंडळींकडून आपसूक उमटली.