अहिल्यानगर: रयत शिक्षण संस्थेच्या नगर शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे (कापड बाजार) मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली रद्द करावी, या मागणीसाठी आज, मंगळवारपासून शाळेतील विद्यार्थी व पालक संघ समितीने संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयाच्या आवारात (बुरुडगाव रस्ता) उपोषण सुरू केले आहे. माजी विद्यार्थीही आंदोलनस्थळी उपस्थित आहेत.
विद्यार्थ्यांनी ‘लंके सरांची बदली रद्द करा’, ‘आमचे लाडके शिक्षक परत द्या’, असे मागणी करणारे फलक हाती घेतले होते. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला होता. यामुळे शाळेचे शैक्षणिक कामकाज बंद पडले.
यासंदर्भात पालक संघाने २८ जूनला संस्थेला लेखी पत्राद्वारे आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती. मात्र, ठोस कारवाई झाली नसल्यामुळे आजपासून विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले आहे. यावेळी पालक संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, लंके सर हे निष्ठावान, विद्यार्थीप्रिय व कार्यक्षम शिक्षक आहेत. त्यांनी शाळेचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यांची अचानक बदली म्हणजे विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे ही बदली रद्द होईपर्यत उपोषण सुरू राहणार आहे. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक उपस्थित आहेत.