बीड जिल्ह्यातील परळीमध्ये घडलेल्या करूणा शर्मा यांच्या प्रकरणानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सूचक ट्विट करत टीका केल्याचं समोर आलं आहे. “परळी सुन्न आहे, मान खाली गेली आहे राज्याची.” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.  दरम्यान, बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. याचबरोबर त्यांच्या वाहनचालकास एक दिवसाची पोलीस कोठडी देखील सुनावली गेली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच ट्विट समोर आल्याचं दिसत आहे.

करुणा शर्मा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

“अन्याय चुकीच्या लोकांच्यात ताकत असल्यामुळे होतो असे नाही, पराक्रमी हात बांधून बसतात म्हणुन होतो. शासन, प्रशासन, न्यायव्यवस्था कोणी आपल्या दारात नाही बांधू शकत, हा विश्वास हरवू नये. wrong Precedent  should not be set! ही काळाची गरज आहे. परळी सुन्न आहे मान खाली गेली आहे राज्याची.” असं पंकजा मुंडे यांनी ट्विद्वारे म्हटलं आहे.

परळीमध्ये करुणा शर्मांच्या वाहनात आढळले पिस्तूल!

तर, करूणा शर्मा प्रकरणावर भाजपाने काहीशी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशास्पद असून, गाडीत पिस्तूल कुणी ठेवलं याची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी भाजपाचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

या सर्व घडामोडी अतिशय संशयास्पद आहेत –

“करूणा मुंडे यांच्याबद्दल दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ज्या नाट्मय घडामोडी घडलेल्या आहेत, तसं पाहिलं तर त्यांचं हे कौटुंबिक प्रकरण आहे. मात्र आता हे कौटुंबिक प्रकरण राहिलेलं नाही, हे सार्वजनिक झालेलं आहे. ज्या पद्धतीने करूणा मुंडे यांनी जाहीर केलं होतं की, परळीमध्ये येऊन मी माझी भूमिका पत्रकारपरिषदेच्या माध्यमातून मांडेल. हे त्यांनी जाहीर केलं होतं व त्यासाठी त्या आल्या होत्या. मात्र त्या आल्यानंतर ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या सगळ्या संशयास्पद आहेत. त्या ठिकाणी गर्दी जमवल्या गेली. पोलीस बंदोबस्त लावला गेला. त्यानंतर त्यांच्या गाडीत शस्त्र आढळल्याचं जे समोर आलं, या सर्व घडामोडी अतिशय संशयास्पद आहेत. याप्रकरणी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे.” असं भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के म्हणाले आहेत.