छत्रपती संभाजीनगर – “कॉक्रोच” शब्द न्यायालयीन दरवाज्यातून बाहेर काय निघाला अन त्यावरून तेच नाव धारण करत जनता पार्टी सोशल मीडियावर काय अवतरली ! सारा गहजब उडाला. राजकीय-सामाजिक वातावरण ढवळून निघाले. या वातावरणाने लक्षवेधले ते एका झुरळांच्या मंदिराकडे. होय, झुरळांचेही मंदीर आहे आणि या मंदिरात झुरळांना देवत्त्वाचा मान दिला गेला असून, तशी आख्यायिकाही सांगितली जात आहे.

महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यातील परळी शहरात असे एक मंदिर आहे जिथे साधारणतः ३०० वर्षांपासून झुरळांना देवत्वा प्रमाणे मान  दिला जातो! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीतील त्या मंदिराला “झुरळे गोपीनाथ” हे नाव आहे. या मंदिरात शेकड्यांच्या संख्येने झुरळांचा मुक्त वावर आढळतो. येथे झुरळांना क्षुल्लक समजून दूर झाडले जात नाही. तर त्यांच्याकडे “गोपिकांचे रूप” म्हणून पाहिले जाते. आणि देवस्वरुप समजले जाते.

“झुरळांना नमस्कार केला जातो!

सामान्यतः घरात झुरळ दिसले की लोकांचा पहिला प्रयत्न असतो तो ते मारण्याचा किंवा झाडू-फड्याने बाहेर झाडण्याचा. मात्र परळीतील या मंदिरात चित्र पूर्णपणे उलट आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात, मूर्तीभोवती आणि भिंतींवर वर्षभर झुरळांचा मुक्त वावर असतो. आश्चर्याची बाब म्हणजे, भाविकांच्या मते ही झुरळे कोणालाही त्रास देत नाहीत. उलट ज्यांच्या अंगावर झुरळ पडते, त्याला भाग्यवान समजले जाते.

झुरळे गोपीनाथ’ची आख्यायिका

झुरळे गोपीनाथ मंदिराच्या आख्यायिकेनुसार भगवान श्रीकृष्णाने कलियुगात आपल्यासोबत राहण्यासाठी गोपिकांना झुरळांच्या रूपात पृथ्वीवर वास्तव्य करण्याचा वर दिला. त्यामुळे या मंदिरातील झुरळांना “गोपिकांचे रूप” मानले जाते. गणेशपार भागातील बडवे कुटुंबातील एका व्यक्तीला स्वप्नात श्रीकृष्णाने दर्शन देत घराशेजारील ठिकाणी मूर्ती असल्याचे सांगितले. त्यानंतर खोदकामात शालिग्राम पाषाणातील चतुर्भुज विष्णूमूर्ती सापडली आणि तेव्हापासून या मंदिराची ओळख “झुरळे गोपीनाथ” अशी झाली.

खोल गाभारा.. झुरळंच-झुरळे!

झुरळे गोपीनाथ मंदिर जमिनीपासून जवळपास दहा फूट खोल आहे. गाभाऱ्यात दहा पायऱ्या उतरून भाविकांना जावे लागते. गाभाऱ्यातील भगवान विष्णूंच्या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असून मूर्तीभोवती सतत झुरळांचा खेळता वावर दिसतो. मूर्तीसमोर उभे राहिल्यावर भाविकांना “भीती”पेक्षा “भक्ती”चा अनुभव येतो. विशेष म्हणजे मंदिरात झुरळे असूनही येथे कोणतीही दुर्गंधी जाणवत नाही, असे श्रद्धावान भाविक सांगतात.

परळीत अनोखी परंपरा

परळी क्षेत्रात हर आणि हरी या दोघांचेही महत्त्व आहे. वैद्यनाथ म्हणजे महादेव तर गोपीनाथ म्हणजे विष्णू. त्यामुळे वैद्यनाथ दर्शनानंतर झुरळे गोपीनाथांचे दर्शन घेण्याची परंपरा आजही कायम आहे. परळीतील हे मंदिर मात्र एक वेगळाच संदेश देताना दिसते. मात्र हे मंदिर आजही मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्यात सभामंडपात पाणी गळते, भिंती ओलसर होतात आणि भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.  अनोख्या धार्मिक वारशाच्या जतनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी आहे.