अशोक तुपे

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर पाहिल्यांदाच नगर पंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होणार आहे. आता भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होणार असून काँग्रेस शिवसेना यांना अस्तित्व दाखविताना मोठी कसरत करावी लागेल. विशेष म्हणजे तीन मंत्र्यांच्या नेतृत्वाचा कसही लागेल.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे नेते व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख तसेच ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पहिल्यांदाच स्थानिक राजकारणात रोखठोक भूमिका घ्यावी लागेल. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार, नीलेश लंके, डॉ. किरण लहमटे हे राष्ट्रवादीचे आमदार तसेच भाजपच्या आमदार मोनिका राजळे, माजी आमदार वैभव पिचड, सेनेचे माजी मंत्री विजय औटी यांच्या प्रतिष्ठेच्या या निवडणुका आहेत.

पारनेर, अकोले, कर्जत नगर पंचायती आणि शेवगाव व जामखेड या पालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. प्रत्येकी १७ जागा असलेल्या तीनही नगर पंचायतींच्या निवडणुका डिसेंबरअखेरीस वा नववर्षांच्या प्रारंभी होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात शेवगाव आणि जामखेड नगर परिषदांच्या निवडणुका जानेवारीच्या शेवटी वा फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहेत. या दोन्ही नगर परिषदांमध्ये नगरसेवक संख्या प्रत्येकी २१ आहे.

कर्जत- जामखेड या विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार  भाजपचे नेते व माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून निवडून आले. कर्जत नगर पंचायत भाजपच्या ताब्यात आहे. कर्जतला भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई होईल. पण शिवसेना व काँग्रेसला अस्तित्व दाखविणे मोठे कठीण आहे. तर जामखेड नगरपालिका निवडणुकीत गेल्यावेळी राष्ट्रवादी १०, भाजप ३, मनसे ३, अपक्ष ३ आणि शिवसेना ४ असे संख्याबळ होते. जामखेड पालिका तांत्रिकदृष्टय़ा भाजपकडे आहे. मात्र निवडणुकीनंतर पुन्हा नगरसेवक राष्ट्रवादीला जाऊन मिळाले आहेत.

पारनेर नगर पंचायतीत सेना ८, काँग्रेस १, राष्ट्रवादी २, अपक्ष ६ असे संख्याबळ होते. सुरुवातीला सेनेचे विजय औटी यांच्या विरोधात ही नगर पंचायत होती. पण नंतर औटींच्या ताब्यात सत्ता आली. आता विधानसभा निवडणुकीनंतर आमदार नीलेश लंके यांनी औटींना धक्का देऊन नगरसेवक फोडले. त्याची दखल मातोश्रीने घेतली. अखेर राष्ट्रवादीने नगरसेवक पुन्हा सेनेकडे पाठविले. पण आता खरा सामना सेना विरुद्ध राष्ट्रवादी असाच होणार आहे.

शेवगाव पालिका भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या ताब्यात आहे. तेथे राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक गट आहे. ही पालिका टिकविणे हे राजळे यांच्यापुढे आव्हान आहे. तर अकोले येथे राष्ट्रवादीची सत्ता होती. पण आता माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पिचड विरोधकांची एकजूट करून विधानसभेत लहमटे यांना निवडून आणले.

पाचही ठिकाणी काँग्रेसची अवस्था वाईट आहे. प्रदेशाध्यक्ष थोरात यांना अस्तित्व दाखवावे लागेल. पण महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला झटका देणे मुश्कील आहे. ते धाडस ते करणार नाहीत, असे चित्र आहे. माजी मंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर सेनेने मंत्री गडाख यांचा सेनाप्रवेश करून घेतला. त्यांच्यावर जिल्ह्य़ाची जबाबदारी टाकली. सेनेत मरगळ आली आहे. सत्ता असून अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीला मोठे यश मिळाले तर नगरच्या राजकारणात त्यांची पकड घट्ट होईल. सेना व काँग्रेस दोघांसाठी हा धोका आहे. लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होईल.

राष्ट्रवादीच्या तरुण नेतृत्वाची पहिली निवडणूक

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे रोहित पवार, नीलेश लंके, डॉ. किरण कानकाटे आणि प्राजक्त तनपुरे हे निवडून आले. तनपुरे हे मंत्री झाले. ते अधूनमधून जिल्ह्य़ात दौरे करतात, पण मतदारसंघातच ते असतात. त्यांना पवार यांनी संधी दिली. पहिल्याच निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, तर तनपुरे यांच्या वाटचालीसाठी धोकादायक ठरू शकते. अन्य तिघा आमदारांना पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. राजकीय बस्तान बसविण्यासाठी त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे.